♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

घाटबोरीत अल्पवयीन मुलीचा विवाह; पाच जणांवर गुन्हा ! बालविवाहाचा धक्कादायक प्रकार उघडकीस; आरोग्य केंद्राच्या नोंदीतून प्रकरण समोर

MH 28 News Live / डोणगाव : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाटबोरी येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत डोणगाव पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ७ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटबोरी येथील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी शरद भागवतराव वानखडे यांना समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रीती गवई यांच्याकडून या प्रकरणाची लेखी माहिती प्राप्त झाली. आरोग्यवर्धिनी केंद्रातील नोंदी तपासल्यानंतर संबंधित मुलीचा जन्मदिनांक १५ फेब्रुवारी २००८ असल्याचे स्पष्ट झाले. तिचा विवाह घाटबोरी येथील एका तरुणासोबत झाल्याचे तसेच विवाहाच्या काळात ती गरोदर असल्याचे आरोग्य नोंदीतून समोर आले.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी तत्काळ बाल कल्याण समिती, बुलढाणा यांना अहवाल सादर केला. समितीने २४ ऑगस्ट २०२६ रोजी संबंधित मुलीचे समुपदेशन केले. त्यानंतर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. जन्मतारखेच्या आधारे विवाहाच्या वेळी मुलगी १८ वर्षांपेक्षा कमी वयाची असल्याचे निष्पन्न झाल्याने बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून डोणगाव पोलिसांनी कारवाई केली. अमोल राजू नवघरे, राजू नारायण नवघरे, नंदा राजू नवघरे (सर्व रा. घाटबोरी), भारत गोविंदा पवार आणि कमल भारत पवार (रा. आधुड) यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मधील कलम ९, १० व ११ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डोणगाव पोलीस करत आहेत.

बालविवाह म्हणजे केवळ कायद्याचे उल्लंघन नाही; बालपणावर घाला

अल्पवयात विवाह झाल्यामुळे मुलींच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि भविष्यातील संधींवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुलगी १८ वर्षांची होण्यापूर्वी तिचा विवाह लावून देणे ही सामाजिक प्रथा म्हणून दुर्लक्षित करण्याची बाब नसून कायद्याने प्रतिबंधित कृत्य आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास गप्प बसू नका. संबंधित प्रशासन, पोलीस किंवा बाल संरक्षण यंत्रणेला माहिती द्या. एका वेळी घेतलेला जागरूकतेचा निर्णय एखाद्या मुलीचे संपूर्ण आयुष्य वाचवू शकतो.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129