♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चोरीलाही लागते सुपीक डोके ! बुलढाणेकरांनी महावितरणलाच दिला ४४० व्होल्टचा झटका, अकोला परिमंडळात सर्वाधिक चोरी बुलढाणा जिल्हात

MH 28 News Live : नकळत विजेच्या तारेला हात लागला तरी जीव घाबरतो, पण काही महाभागांनी थेट महावितरणच्याच नाकावर टिच्चून वीज चोरीचा असा काही जुगाड लावलाय की खुद्द महावितरणच चक्रावून गेले आहे. चोरी करण्यासाठीही डोकं लागतं, याचा प्रत्यय अकोला परिमंडळात आला आहे.

महावितरणने एप्रिलपासून वीज चोरांविरुद्ध कंबर कसून विशेष मोहीम हाती घेतली. अकोला, वाशीम आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांत छापेमारी केली आणि जे समोर आलं ते थक्क करणारं होतं. तब्बल १६१२ ठिकाणी:वीज चोरी सुरू असल्याचं उघड झालं. फक्त ऑगस्ट महिन्यातच ४३६ चोऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे.

चोरीचे प्रकार तर एक से बढकर एक ! कोणी थेट खांबावरून हूक टाकून वीज ओढली, तर कोणी हायटेक साधनांनी मीटरमध्येच फेरफार करून महावितरणला लाखोंचा गंडा घातला. अशा १४७५ प्रकरणांमध्ये तब्बल २ कोटी ६५ लाख रुपयांची वीज चोरी निष्पन्न झाली आहे.

आकडेवारी बोलते, बुलढाणा अव्वल !

या आकडेवारीत सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे, तीन जिल्ह्यांमध्ये वीज चोरीत बुलढाणा जिल्हा नंबर वन ठरला आहे.

– *बुलढाणा:* ९३४ वीज चोऱ्या उघड! त्यापैकी ८६६ प्रकरणात १ कोटी ४७ लाखांची हानी.
– *अकोला:* ३४६ चोऱ्या, ३२८ प्रकरणात ७३ लाखांची हानी.
– *वाशीम:* ३३२ चोऱ्या, २८१ प्रकरणात ४३ लाखांची हानी.

थोडक्यात, महावितरणला ४४० व्होल्टचा करंट देण्याचं काम सर्वाधिक बुलढाण्यात झालंय !

दरम्यान, महावितरणने वसुलीलाही जोर लावला आहे. निष्पन्न झालेल्या २ कोटी ६५ लाखांपैकी ८८१ चोरट्या ग्राहकांनी घाबरून १ कोटी ७७ लाख रुपये महावितरणच्या तिजोरीत जमा केले आहेत. उर्वरित चोरांवर कारवाई सुरू आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129