♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

दलित वस्तीत विद्युत डीपीचा भीषण स्फोट; सायाळ्यात मोठा अनर्थ टळला ! आगीने घेतले रौद्र रूप, दीड हजार ग्रामस्थांचा जीव धोक्यात ! ‘ महावितरण ‘ चा हलगर्जीपणा ठरला कारणीभूत

MH 28 News Live / साखरखेर्डा : येथून जवळच असलेल्या सायाळा या गावातील दलित वस्तीमध्ये विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) डीपीला अचानक भीषण आग लागल्याने शुक्रवारी दुपारी एकच खळबळ उडाली. डीपीमधून अचानक मोठा आवाज झाल्यानंतर काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या भडकलेल्या ज्वाळा पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही; मात्र डीपीमधून ऑइल गळत असल्याची पूर्वकल्पना महावितरणला देऊनही योग्य दुरुस्ती न झाल्याने हा प्रकार घडला का, असा गंभीर प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

ही घटना शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास घडली. सुमारे दीड हजार लोकसंख्या असलेल्या सायाळा गावाचा वीजपुरवठा सुलतानपूर येथील महावितरणच्या सबस्टेशनशी जोडलेला आहे. दलित वस्तीतील डीपीमधून काही दिवसांपूर्वीच ऑइल गळती होत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली होती. मात्र त्यावेळी केवळ थातूरमातूर स्वरूपाची कारवाई करण्यात आली आणि डीपीची आवश्यक ती दुरुस्ती झाली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

दरम्यान, शुक्रवारी दुपारी अचानक डीपीमधून मोठा स्फोटासारखा आवाज झाला. त्यानंतर क्षणार्धात डीपीने पेट घेतला. आगीच्या तीव्र ज्वाळा पाहून नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. संभाव्य धोका लक्षात घेऊन ग्रामस्थांनी तातडीने महावितरणला घटनेची माहिती दिली. वस्तीमध्येच ही घटना घडल्याने मोठा अनर्थ होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

वेळीच दुरुस्ती झाली असती तर दुर्घटना टळली असती.

सुदैवाने डीपीच्या परिसरात मोठी गर्दी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वस्तीच्या ठिकाणी विद्युत डीपीला लागलेली आग भविष्यातील संभाव्य धोक्याची गंभीर घंटा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. डीपीमधून ऑइल गळत असल्याची माहिती पूर्वीच देण्यात आली होती, तरीही त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे महावितरणच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना ओढवली का ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

आज जीव वाचले; उद्या अनर्थ झाला तर ?’

विद्युत यंत्रणेची वेळोवेळी तपासणी व देखभाल न झाल्यास अशा घटनांची पुनरावृत्ती होऊन एखाद्या दिवशी मोठा अनर्थ घडू शकतो, अशी भीती सायाळावासीयांनी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या तक्रारींकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याची किंमत निष्पाप नागरिकांना मोजावी लागू शकते. त्यामुळे महावितरणने घटनेची तातडीने दखल घेऊन संबंधित डीपीची पूर्ण तपासणी व आवश्यक दुरुस्ती करावी, तसेच परिसरातील इतर विद्युत यंत्रणांचीही पाहणी करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129