♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिडीमारांनो सावधान ! दामिनी पथक ॲक्शन मोडमध्ये; कपिल खेडेकर यांच्या विनंतीला प्रतिसाद चिखलीतील कोचिंग क्लासेसवर दामिनी पथकाची धडक भेट; संचालकांना सुरक्षेबाबत कडक सूचना

MH 28 News Live / चिखली : शहरातील कोचिंग क्लासेस परिसरात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना बुलढाणा येथून विशेष दामिनी पथकाने चिखली शहरातील विविध कोचिंग क्लासेसना भेटी देऊन पाहणी केली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांच्या विनंतीवरून दामिनी पथकाने ही विशेष मोहीम राबविली. त्यामुळे क्लासेसच्या परिसरात मुलींचा पाठलाग, छेडछाड अथवा अश्लील शेरेबाजी करणाऱ्या चिडीमारांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.

डीपी रोड परिसरातील पारधी बाबा मंदिराजवळ मोठ्या संख्येने कोचिंग क्लासेस आहेत. या ठिकाणी विद्यार्थिनींची मोठी वर्दळ असते. दामिनी पथकातील अधिकाऱ्यांनी या परिसरातील विविध क्लासेसना भेटी देत संचालकांशी चर्चा केली. क्लासमध्ये येणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संचालकांना देण्यात आल्या. तसेच क्लासमधील आसनव्यवस्था, प्रवेश-निर्गमनाची व्यवस्था आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या सुविधांची पाहणी करण्यात आली.

शहरातील इतर क्लासेसवरही पथकाची नजर

दामिनी पथकाने केवळ डीपी रोड परिसरापुरती कारवाई मर्यादित न ठेवता चिखली शहरातील विविध भागांत भरणाऱ्या कोचिंग क्लासेसनाही भेटी दिल्या. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना देतानाच क्लास परिसरात कोणत्याही प्रकारची छेडछाड किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले. महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाकडून प्रतिबंधात्मक गस्त आणि जनजागृतीवरही भर दिला जात आहे.

चिडीमारांवर राहणार पोलिसांची करडी नजर

महिला व मुलींना छेडणे, पाठलाग करणे किंवा अश्लील शेरेबाजी करणे यासारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी दामिनी पथक सक्रिय असते. शाळा – महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, बसस्थानके, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी पथकाकडून लक्ष ठेवले जाते. त्यामुळे आता चिखली शहरातील कोचिंग क्लासेस परिसरात मुलींचा पाठलाग करून त्रास देणाऱ्या चिडीमारांची सुटका होणार नसल्याचा इशारा या कारवाईतून मिळाला आहे.

संकटात सापडलेल्या महिला किंवा मुलींनी तातडीने पोलिसांची मदत घ्यावी. महाराष्ट्रात आपत्कालीन पोलीस मदतीसाठी ११२ हा क्रमांक उपलब्ध आहे. बुलढाणा जिल्ह्यात दामिनी पथकाशी संपर्क साधण्यासाठी ९८९०२७५०४०, तर जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षासाठी ०७२६२-२४२४०० हा क्रमांक उपलब्ध आहे. दामिनी पथकाच्या या कारवाईमुळे चिखली शहरातील मुली आणि त्यांच्या पालकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होणार आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129