
SIR मोहिमेची प्रारुप मतदार यादी ३१ ऑगस्टला येणार; नाव नसल्यास महिनाभराची संधी ! आपले नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो आणि मतदान केंद्राची माहिती तपासून घ्या !
MH 28 News Live / बुलढाणा : राज्यात राबविण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेनंतर ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदाराने या यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रारूप यादीत नाव नसल्यास संबंधित मतदारांना ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत दावा किंवा हरकत दाखल करून नाव समाविष्ट करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे.

ऑनलाइन यादी तपासण्याची सुविधा
प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे मतदारांना महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या ceo.maharashtra.gov.in तसेच निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या संकेतस्थळांवर तपासता येणार आहे. याशिवाय संबंधित बीएलओ (BLO) यांच्याकडूनही मतदार यादीतील नावाची माहिती घेता येईल.
केवळ नाव पाहू नका; संपूर्ण तपशील तपासा
मतदार यादीत नाव असल्याचे आढळल्यानंतर केवळ त्यावर समाधान न मानता मतदारांनी आपल्या नोंदीतील सर्व तपशील काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. नावाची स्पेलिंग, वय किंवा जन्मतारीख, छायाचित्र, पत्ता, मतदार क्रमांक (EPIC) तसेच मतदान केंद्र योग्य आहे का, याची खात्री करावी. यापैकी कोणत्याही तपशिलात चूक आढळल्यास त्याबाबत दावा किंवा हरकत दाखल करता येईल. नाव, पत्ता, वय, फोटो आदी तपशील दुरुस्त करण्यासाठी नमुना क्रमांक ८ भरता येतो.
नाव नसल्यास ३० सप्टेंबरपर्यंत दावा करता येणार
३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी तपासल्यानंतर आपले नाव त्यात नसल्याचे आढळल्यास मतदारांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत दावा किंवा हरकत दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर संबंधित दावे-हरकतींवर सुनावणी होणार आहे.
नवीन मतदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी अथवा यापूर्वी वगळण्यात आलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक ६ आवश्यक कागदपत्रे व घोषणापत्रासह सादर करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा
नाव नोंदणी किंवा नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी अर्ज करताना आधारकार्ड, जन्माचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, २०२५ च्या मतदार यादीतील तपशीलाचा स्क्रीनशॉट किंवा छायाचित्र आणि एक पासपोर्ट आकाराचा फोटो अशी कागदपत्रे आवश्यक राहतील. त्यामुळे मतदारांनी ही कागदपत्रे आधीच तयार ठेवावीत.
२०२५ मध्ये नाव होते, पण २०२६ मध्ये नाही ?
विशेष सखोल पुनरीक्षणानंतर २०२५ च्या मतदार यादीत नाव असतानाही २०२६ च्या प्रारूप यादीत नाव आढळत नसल्यास संबंधित मतदारांनी याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अशा मतदारांसाठी महाराष्ट्र सीईओच्या एसआयआर पोर्टलवर ASDD (Absent/Shifted/Dead/Duplicate) तपासणीची स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेच्या माध्यमातून नाव का आढळत नाही, याबाबतची माहिती तपासता येणार आहे.
प्रारूप यादी अंतिम नाही
दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी ही अंतिम यादी नसल्याचे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रारूप यादीत नाव वगळले गेले असल्यास संबंधित मतदारांना दावा दाखल करून नाव समाविष्ट करण्याची संधी आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने ३१ ऑगस्टनंतर आपले नाव आणि संपूर्ण मतदार तपशील तपासून, काही त्रुटी असल्यास निर्धारित मुदतीत आवश्यक अर्ज दाखल करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.



