♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार…! रक्षाबंधनासाठी निघालेल्या मायलेकींचा दुर्दैवी अंत; संतप्त जमावाने बोलेरो पेटवली

MH 28 News Live / संग्रामपूर : रक्षाबंधनाच्या पवित्र सणासाठी माहेरी निघालेल्या कुटुंबावर भरधाव आणि कथित मद्यधुंद बोलेरो चालकाने काळाचा घाला घातल्याची हृदयद्रावक घटना संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर गावाजवळ घडली. बोलेरोने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत आईसह तिच्या अवघ्या सात महिन्यांच्या चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रौद्ररूप धारण करत बोलेरो वाहन पेटवून दिले.

२८ ऑगस्ट रोजी सायंकाळी टुणकी ते लाडणापूर मार्गावर हा भीषण अपघात झाला. मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील जसौंदी येथील सपना संजय वासकला आणि तिची सात महिन्यांची मुलगी पूर्वी संजय वासकला अशी मृतांची नावे आहेत. सपनाचा सहा वर्षांचा मुलगा सनवीर संजय वासकला आणि तिचा भाऊ कमलेश भुरलाल चंगळ हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.

कमलेश चंगळ हा रक्षाबंधनासाठी बहीण सपनाला माहेरी आणण्यासाठी जसौंदी येथे गेला होता. त्यानंतर सपना, तिची मुले आणि कमलेश असे दुचाकीने येत असताना लाडणापूर शिवारात एमपी १२ झेडएच ९३४२ क्रमांकाच्या बोलेरोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, या अपघातात चिमुकली पूर्वीचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या सपनाचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

धुंद चालकाचा कहर

स्थानिकांच्या माहितीनुसार, बोलेरो चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता. भरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली.

रक्षाबंधनाच्या वाटेवर काळाचा घाला

भावाकडून राखी बांधून घेण्यासाठी माहेरी निघालेल्या सपनावर नियतीने घाला घातला. रक्षाबंधनाचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या या कुटुंबावर काही क्षणांतच दुःखाचा डोंगर कोसळला. माय आणि सात महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संतप्त जमावाचा रौद्र उद्रेक

अपघातानंतर संतप्त नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत बोलेरो वाहन पेटवून दिले. जखमी चालकाला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेवरही दगडफेक करून तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे. चालकाला आपल्या ताब्यात देण्याची मागणी जमावाकडून करण्यात येत होती.
घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि जखमी चालकाला जमावाच्या तावडीतून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवले. यावेळी झालेल्या झटापटीत काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अपघातासह त्यानंतर झालेल्या हिंसक प्रकाराचा पोलीस तपास करीत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129