
राखीच्या धाग्यासोबत निसर्गाशीही जोडले नाते ! बहिणीला पैशांऐवजी दिले चक्क झाड; पत्रकार प्रशांत चव्हाण यांचा अनोखा रक्षाबंधन उपक्रम
MH 28 News Live / चिखली : रक्षाबंधन म्हटले की बहिणीने भावाच्या मनगटावर प्रेमाचा धागा बांधायचा आणि भावाने बहिणीला ओवाळणी म्हणून पैसे, साडी किंवा एखादी भेटवस्तू द्यायची, ही परंपरा सर्वश्रुत आहे. मात्र या पारंपरिक रिवाजाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत पत्रकार प्रशांत चव्हाण यांनी यंदाचे रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरे केले. त्यांनी आपल्या बहिणीला महागडी भेटवस्तू न देता चक्क एक झाड भेट देत निसर्गरक्षणाचा अनोखा संदेश दिला.

बहिणीला झाड देताना प्रशांत चव्हाण यांनी, “या झाडाची लागवड कर, त्याची नियमित देखभाल कर आणि त्याला मोठे कर. हे झाड मोठे होत असताना प्रत्येक वेळी तुला आपल्या रक्षाबंधनाची आठवण करून देईल,” असा भावनिक संदेश दिला. त्यामुळे ही भेट केवळ एका रोपट्याची न राहता भाऊ – बहिणीच्या नात्याची आणि निसर्गाशी असलेल्या आपुलकीची जिवंत आठवण ठरणार आहे.
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि संरक्षणाच्या भावनेचा सण. याच भावनेला पर्यावरण संवर्धनाशी जोडण्याचा हा उपक्रम निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. पैसे किंवा महागड्या वस्तू काही काळ आनंद देतात; मात्र एक झाड लावून ते जगविले तर त्याची सावली, प्राणवायू आणि हिरवाई पुढच्या अनेक पिढ्यांना लाभते. त्यामुळे सण-समारंभांच्या निमित्ताने झाडे भेट देण्याची आणि त्यांचे संगोपन करण्याची संस्कृती रुजणे ही काळाची गरज आहे.
विकासाच्या नावाखाली निसर्गाचे संतुलन धोक्यात
वाढते शहरीकरण, रस्ते व इमारतींचे बांधकाम तसेच विविध विकासकामांमुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. परिणामी तापमानवाढ, पावसाच्या लहरीपणात वाढ, मातीची धूप आणि पर्यावरणीय असमतोल यांसारख्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. अशा परिस्थितीत वृक्षारोपणाबरोबरच लावलेले झाड जगविणे हीच खरी पर्यावरणसेवा आहे.
“एक झाड तोडण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. अपरिहार्य कारणाने एखादे झाड तोडावे लागलेच, तर त्याच्या बदल्यात अनेक झाडे लावून ती जगविण्याची जबाबदारी घ्या,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
केवळ पावसाळ्यात रोपटे लावून छायाचित्र काढणे आणि त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करणे, यापेक्षा रोपट्याचे संगोपन करून त्याचे वृक्षात रूपांतर करणे महत्त्वाचे आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीला दिलेले हे झाड भविष्यात मोठे होईल, सावली देईल, प्राणवायू निर्माण करेल आणि पर्यावरण समृद्ध करण्यास हातभार लावेल.
“भाऊ-बहिणीचे नाते जपा आणि त्यासोबत निसर्गाशी असलेले आपले नातेही जपा,” हा संदेश देणारा प्रशांत चव्हाण यांचा हा अनोखा रक्षाबंधन उपक्रम समाजात पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची नवी प्रेरणा देणारा ठरत आहे.



