
भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला ! पाच वर्षांच्या आयांशला खाली पाडून फरफटले; शरीरावर खोल जखमा, जिल्हा रुग्णालयात उपचार
MH 28 News Live / चिखली : शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच वार्ड क्रमांक १० मध्ये संतापजनक घटना घडली. अवघ्या पाच वर्षांच्या आयांश प्रमोद सुरडकर या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांच्या आक्रमक टोळीने अचानक हल्ला केला. कुत्र्यांनी आयांशला खाली पाडून फरफटत नेले आणि त्याच्या शरीरावर दोन ठिकाणी खोलवर चावे घेतल्याने तो गंभीर जखमी झाला. सध्या त्याच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नगरपरिषदेच्या श्वान नियंत्रणाच्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयांश घराबाहेर खेळत असताना अचानक भटक्या कुत्र्यांच्या टोळीने त्याच्यावर झडप घातली. कुत्र्यांनी त्याला खाली पाडून हल्ला सुरू केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. आयांशच्या आरडाओरडामुळे नागरिकांचे लक्ष गेले. शेजारील नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत कुत्र्यांनी चिमुकल्याला जखमी केले होते. घटनेनंतर नागरिकांनी आयांशला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार तसेच रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देण्यात आले. मात्र, जखमांची गंभीरता लक्षात घेऊन त्याला पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नगरपरिषदेने तब्बल ४६ लाख रुपये खर्च करून २ हजार ४९५ भटक्या श्वानांचे निर्भीजीकरण केल्याचा दावा केला होता. श्वान नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असताना प्रत्यक्ष शहरातील परिस्थिती मात्र वेगळीच चित्र दाखवत आहे. गल्लीबोळ, वस्त्या आणि विविध वॉर्डांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या फिरताना दिसत असून, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
४६ लाखांचा खर्च आणि २,४९५ श्वानांचे निर्भीजीकरण झाले असे सांगितल्यानंतरही एका पाच वर्षांच्या चिमुकल्यावर कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला होतो, तर श्वान नियंत्रणाची ही मोहीम नेमकी किती प्रभावी ठरली? असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत. केवळ कागदोपत्री आकडे आणि निधी खर्चाचे दावे करण्यापेक्षा प्रत्यक्ष शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी झाला आहे का, याची प्रशासनाने तपासणी करण्याची गरज आहे.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये नगरपरिषदेच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, आक्रमक कुत्र्यांची समस्या नियंत्रित करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे. चिमुकल्याच्या जखमांनंतर तरी प्रशासन जागे होणार का, की आणखी एखाद्या गंभीर दुर्घटनेची वाट पाहणार ? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.



