♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जिल्हा बँकेत पुन्हा शिंगणे पर्व… अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र शिंगणे; उपाध्यक्षपदी गोविंदराव मिरगे

MH 28 News Live / बुलढाणा : जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक पार पडल्यानंतर पंधरा दिवसांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा टप्पाही अविरोध पार पडला. बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, तर उपाध्यक्षपदी गोविंदराव मिरगे यांची अविरोध निवड करण्यात आली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाली. संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर आता बँकेच्या सर्वोच्च पदाची सूत्रे पुन्हा डॉ. शिंगणे यांच्या हाती आल्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळात या निवडीची चर्चा सुरू झाली आहे.

सर्वपक्षीय सहकार की राजकीय समीकरण ?

डॉ. शिंगणे यांचा राजकीय प्रवास पाहता या निवडीला केवळ सहकार क्षेत्रातील निर्णय म्हणून पाहणे कठीण आहे. एकीकडे महायुतीतील विविध पक्षांचे नेते बँकेच्या संचालक मंडळात आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाशी संबंधित असलेल्या डॉ. शिंगणे यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या राजकारणातील पक्षीय समीकरणे आणि व्यापक राजकीय गणिते यांची सांगड या निवडीत घातली गेल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे बँकेच्या संचालक मंडळात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि मंत्री आकाश फुंडकर यांच्यासारखे प्रमुख नेते असतानाही अध्यक्षपदासाठी त्यांच्याकडून दावा करण्यात आला नाही. त्यामुळे डॉ. शिंगणे यांच्यासाठी अध्यक्षपदाचा मार्ग तुलनेने सुकर झाला. ही अविरोध निवड सर्वपक्षीय सहमतीचे उदाहरण आहे की भविष्यातील राजकीय समीकरणांची पूर्वतयारी, याचे उत्तर मात्र आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.

शिंगणे कुटुंबाची बँकेशी जुनी नाळ

डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे जिल्हा बँकेशी असलेले नाते केवळ विद्यमान निवडीपुरते मर्यादित नाही. त्यांनी यापूर्वीही जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांचे वडील सहकारमहर्षी स्व. भास्करराव शिंगणे आणि मातोश्री स्व. प्रभावतीकाकू शिंगणे यांनीही या बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. त्यामुळे शिंगणे कुटुंबाचा जिल्हा बँकेच्या नेतृत्वाशी असलेला दीर्घकाळाचा संबंध या निवडीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

अलीकडील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांतील राजकीय चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर डॉ. शिंगणे यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी झालेली पुनर्निवड त्यांच्या राजकीय पुनर्स्थापनेच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या निवडीकडे काहीजण ‘सहकारातील पुनरागमन’, तर काहीजण ‘राजकीय पुनर्वसन’ म्हणून पाहत आहेत. महायुतीतील नेत्यांच्या सहमतीने शरद पवार गटाशी संबंधित नेत्याला सहकारातील महत्त्वाचे पद मिळणे, ही बाब आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने निश्चितच लक्षवेधी आहे.

मात्र, या निर्णयामागे नेमके कोणते राजकीय गणित आहे, याबाबत विविध चर्चा सुरू असल्या तरी त्याला अधिकृत दुजोरा नाही. त्यामुळे चर्चांना तथ्याचा मुलामा न देता त्याकडे राजकीय संकेत म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल. एवढे मात्र स्पष्ट आहे की, जिल्हा बँकेच्या माध्यमातून डॉ. शिंगणे यांनी जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील आपले नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. आता या पदाचा वापर ते सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठी करतात की त्यातून जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

घाटावर-घाटाखाली सत्तेचा समतोल

बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात घाटावर आणि घाटाखाली हा भौगोलिक संदर्भ अनेकदा महत्त्वाचा ठरतो. जिल्हा बँकेच्या नव्या सत्ताकारणातही त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळते. अध्यक्षपदी घाटावरचे डॉ. राजेंद्र शिंगणे, तर उपाध्यक्षपदी घाटाखालील गोविंदराव मिरगे यांची निवड झाल्याने बँकेच्या नेतृत्वात दोन्ही भौगोलिक पट्ट्यांचा मेळ साधला गेला आहे. ही रचना केवळ योगायोग मानायची की संचालक मंडळातील विविध गटांना सोबत घेण्याच्या राजकीय रणनीतीचा भाग, याची चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र, दोन्ही पदांची अविरोध निवड लक्षात घेता या समीकरणामागे व्यापक सहमती असल्याचे संकेत निश्चितच मिळतात.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129