
शेतात मध्यरात्री पोलिसांचा छापा ‘एक्का-बादशहा’ जुगार अड्डा उद्ध्वस्त शिवसेना शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखावर गुन्हा १२ जण ताब्यात, ८.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त
MH 28 News Live / खामगाव, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ग्रामीण पोलिसांनी शेलोडी शिवारातील एका शेतातील टीनशेडवर मध्यरात्री धाड टाकून सुरू असलेल्या ‘एक्का-बादशहा’ जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत १२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण ८ लाख ४३ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी राजू बघे (रा. पिंप्री गवळी) हा शिवसेना शिंदे गटाचा तालुकाप्रमुख असल्याचे पोलिसांनी नमूद केले असून, कारवाईदरम्यान तो घटनास्थळावरून फरार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश काशिनाथ कुवारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ७ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १.४५ वाजता शेलोडी शिवारातील एका शेतातील टीनशेडवर अचानक छापा टाकण्यात आला. त्यावेळी तेथे अनेक जण बेकायदेशीरपणे ‘एक्का-बादशहा’ जुगार खेळताना व खेळवताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व इतर मिळून ८.४३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत संजय शेगोकार, सुनील भोजने, शुभम भोजने, अमोल मुंडाले, सचिन मोहाडे, प्रभाकर तायडे, नंदकिशोर आरे, नासीर खाँ, आकाश हांडे, निवृत्ती हिंगणे, शेख राजीक शेख शफीक आणि विनोद जाधव या १२ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तपासात हा जुगार अड्डा राजू बघे चालवत असल्याचे समोर आले. मात्र, पोलिसांचा छापा पडताच तो घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश कुवारे यांच्या फिर्यादीवरून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २८३/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ व ५ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रतीक्षा जाधव यांनी गुन्हा नोंदवला असून, पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण राऊत पुढील तपास करीत आहेत.
मुख्य आरोपी राजू बघे याचा शोध सुरू असून, या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी फरार आरोपीला लवकरच अटक करण्यासाठी शोधमोहीम तीव्र केली आहे.



