
पश्चिम विदर्भाचा काळा अध्याय; दर ८ तासांनी शेतकरी आत्महत्या निसर्गाचे लहरीपण, शेतकऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत
MH 28 News Live / बुलढाणा : विदर्भात निसर्गाचा लहरीपणा आणि वारंवार येणाऱ्या अस्मानी संकटांनी शेतकरी हवालदिल झाला आहे. कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, तर कधी दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींच्या तडाख्यात शेतकऱ्यांचे आयुष्य रोज होरपळत आहे. यामध्येच कर्जाच्या ओझ्याने त्रस्त शेतकरी शेवटी टोकाचा निर्णय घेत आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत.
पश्चिम विदर्भात दर आठ तासांनी एक शेतकरी मृत्यूचा फास गळ्यात घालत असल्याची भयावह वस्तुस्थिती समोर आली आहे. मागील सहा महिन्यातच अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या पाच जिल्ह्यांत तब्बल ५२७ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. ही संख्या ऐकूनच काळीज सुन्न होते.
यंदाच्या जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत एकट्या यवतमाळ जिल्ह्यात १७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. अमरावतीत १०१, अकोल्यात ९०, बुलढाण्यात ९१ आणि वाशिममध्ये ६७ शेतकऱ्यांनी आपली जीवनरूपी मशागत कायमची थांबवली. दरवर्षी ही आकडेवारी नव्या भीषण पातळीवर पोहचत आहे, याचे दुःखद चित्र विदर्भातील प्रत्येक घराघरात दिसत आहे.
कर्ज, दुष्काळ, विवाहखर्च, आजारपण… आत्महत्येची अनेक कारणे
नैसर्गिक आपत्ती, नापिकी, बँकांचे कर्ज, सावकारांचे वसुलीचे दबाव, मुलींच्या लग्नाचा खर्च, कुटुंबातील आजारपण, शिक्षणासाठीची धडपड – या सगळ्या कारणांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या छातीत दुःखाची काळरात्र पसरली आहे. शासन – प्रशासनाचे उपाय योजनेवर कागदोपत्री चर्चा होत असली, तरी वास्तवात शेतकऱ्याच्या संकटात फारसा फरक पडत नसल्याची परिस्थिती आहे.
२००१ पासून मृत्यूचा रक्तरंजित हिशोब
सन २००१ पासून आतापर्यंत अमरावती विभागातील आत्महत्यांचा आलेख धडकी भरवणारा आहे. अमरावती जिल्ह्यात ५,४७७, यवतमाळमध्ये ६,३५१, अकोल्यात ३,२०७, वाशिममध्ये २,१०७, आणि बुलढाण्यात ४,५३२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. ही केवळ आकडेवारी नाही, तर प्रत्येक आकडा एका कुटुंबाच्या उद्ध्वस्त स्वप्नांची हृदयद्रावक कहाणी सांगतो.
शासनाच्या दुर्लक्षाने वाढतोय शेतकऱ्यांचा आक्रोश
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर नियंत्रणासाठी सरकारकडून योजनांची घोषणा होते. मात्र या योजना कागदावरच मर्यादित राहतात, ही कटू वस्तुस्थिती आहे. प्रत्यक्ष मदत, मानसिक आधार, कर्जमाफी, विमा योजना या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नसल्याने त्यांच्या समस्या अधिकच खोलवर रुजत चालल्या आहेत. प्रत्येक आत्महत्या ही केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नसून, ती संपूर्ण समाजव्यवस्थेवर आणि लोकशाहीवर ओरखडे उमटवणारी घटना आहे. दर आठ तासांनी एक शेतकरी मृत्यूला कवटाळतो… हे फक्त विदर्भाचे नव्हे, तर आपल्या सगळ्यांच्याच काळजाला घायाळ करणारे वास्तव आहे.