
रेती माफियांना माफी नाही ! लोणारच्या तहसीलदारांची समृद्धी महामार्गावर धडक कारवाई; ४.३२ लाखांचा दंड
MH 28 News Live / लोणार ( राहुल सरदार ) : समृद्धी महामार्गावरून बॅरिकेट फोडत चोरट्या मार्गाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या माफियांवर लोणारचे तहसीलदार भूषण पाटील यांनी धडक कारवाई केली. या कारवाईत तीन टिप्पर वाहनांना ताब्यात घेऊन तब्बल चार लाख बत्तीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून तहसीलदार भूषण पाटील यांना समृद्धी महामार्गावर सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीची गोपनीय माहिती मिळताच त्यांनी महसूल विभागाच्या पथकासह सापळा रचला. मात्र, रेती माफिया भरधाव वेगाने टिप्पर पळवत असल्याने थरारक पाठलाग करावा लागला. अखेर, महसूल आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मौजे धानोरा परिसरात ही वाहने जप्त करण्यात आली.
जप्त करण्यात आलेल्या तीन टिप्परमध्ये प्रत्येकी दोन ब्रास अशा एकूण सहा ब्रास रेती वाहतूक केली जात होती. या कारवाईत लोणार महसूल विभागासह मेहकर पोलिसांचे योगदान होते. तहसीलदार भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार आर. एम. डोळे, नायब तहसीलदार मयूर ईप्पर, मंडळ अधिकारी जे. एम. येऊल, पी. आ. डोईफोडे, सुधीर हाणवते, डी. एस. साळवे, मंदार तनपुरे, ग्राम महसूल अधिकारी भगवान मुसळे आणि महसूल सहाय्यक उपस्थित होते.
दरम्यान, प्रत्येक टिप्परमधील दोन ब्रास रेतीसाठी १ लाख ४४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, तिघांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे अवैध रेती वाहतुकीच्या धंद्याला मोठा लगाम बसला असून, पुढील काळात अशा कारवाया आणखी कठोरपणे राबविण्याचा इशारा तहसीलदार भूषण पाटील यांनी दिला आहे.