
लिंगा गावात पंचाहत्तरीनंतरही विकासाचा अंधार, चिखलात अडकले प्रगतीचे स्वप्न, पायाभूत सुविधांचा दुष्काळ
MH 28 News Live / सिंदखेड राजा : तालुक्यातील लिंगा-काटे पांग्री हे सुमारे ७०० लोकसंख्येचं गाव आजही स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे. गावात पाण्यासाठी टाकलेली पाइपलाईन फक्त नावापुरती उरली असून, खोदलेले रस्ते पावसात चिखलाने भरून गेले आहेत. सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने गटारे तुंबलेली असून, त्यामुळे रोगराईचा धोका प्रचंड वाढला आहे.
विद्यार्थ्यांची व रुग्णांची चिखलातून कसरत
गावातील एकमेव रस्ता सध्या चिखलाने माखलेला आहे. पावसाळ्यात तो नदीसारखा वाहतो. या रस्त्यावरून शाळकरी मुलांना शाळेत आणि रुग्णांना दवाखान्यात पोहचण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे.
ग्रामपंचायत गायब, गावकऱ्यांचा संताप
ग्रामपंचायतीच्या कामकाजावर गावकऱ्यांचा तीव्र रोष आहे. “सरपंच गावात राहत नाहीत, सचिव गावात येत नाहीत. मग आमच्या समस्या सोडवणार कोण?” असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे गावकऱ्यांचे साकडे
गावातील दयनीय परिस्थितीवर तोडगा काढावा, या मागणीसाठी गावातील बाळकृष्ण चेके, सुनिल चेके, भानुदास पैठणे, पांडुरंग चेके, शंकर भालेराव, संजय गाढवे, उमेश भालेराव, ज्ञानेश्वर चेके, भारत चेके, अनंथा पैठणे, समाधान चेके, नवरत्न मानवतकर, लताबाई जाधव, सुरेश चेके, उध्दव चेके, संजय चेके, सचिन चेके, कैलास चेके, समाधान पैठणे, राधेश्याम शिंदे, पांडूरंग चेके, प्रदीप भालेराव, शिवानंद चेके, भारत चेके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. “आमचेही जगणे मान्य करा!” असा संतप्त हुंकार गावकऱ्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना दिला आहे.