
येळगावच्या पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेत अन्नातून विषबाधा; पाच विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक
MH 28 News Live / बुलढाणा : तालुक्यातील येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेत अन्नातून विषबाधा झाल्याची संतापजनक व धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली. रात्रीच्या जेवणानंतर तब्बल १३ विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यातील पाच विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर सध्या बुलढाण्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विशेष निगराणीखाली उपचार सुरू आहेत.
निवासी स्वरूपाच्या या शाळेत विद्यार्थ्यांना रोज सकाळी आणि संध्याकाळी भोजन पुरवले जाते. बुधवारी रात्रीच्या जेवणात कढी-भात देण्यात आला होता. जेवण घेतल्यानंतर काही विद्यार्थ्यांना प्रकृती बिघडण्याची लक्षणे जाणवू लागली.
घटनेची तातडीने दखल घेत शिक्षक आणि शाळेच्या अधीक्षकांनी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. प्राथमिक तपासणीत १३ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
घटनेनंतर शाळा प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, तर विषबाधेला नेमके कारण काय, याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरील या धोक्याने पालक वर्गात आणि स्थानिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.