
चिखलीत गुटखा माफियांवर मोठा घाव : आयशर ट्रकभर अवैध गुटखा जप्त, तस्करांच्या गोटात खळबळ
MH 28 News Live / चिखली : बुलढाणा जिल्ह्यात गुटखा माफियांवर कडक कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री मोठी धडक कार्यवाही केली. चिखली-बुलढाणा रोडवर अवैधरित्या वाहतूक होणाऱ्या गुटख्याने भरलेली MP09 G J 1547 क्रमांकाची आयशर गाडी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे थांबवून तपासली असता संपूर्ण गाडी गुटख्याच्या बॉक्सांनी भरलेली आढळली. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ८५ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आल्याचे कळते.
ही कारवाई रात्री साडेसातच्या सुमारास पार पडली. जप्त मुद्देमाल चिखली पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. जिल्ह्यात बंदी असलेल्या गुटख्याचा इतक्या मोठ्या प्रमाणावर साठा व वाहतूक सुरू असल्याचे या प्रकरणातून उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वीच चिखलीत मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त झाला होता. त्यामुळे ही कारवाई गुटखा तस्करांच्या गोटात खळबळ उडवणारी ठरली आहे. या मागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे, याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलीस विभागासमोर उभे राहिले आहे.