
रेल्वेच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू; नांदुरा येथे दुर्दैवी घटना
MH 28 News Live / नांदुरा : रेल्वे स्थानकाजवळ काल (२९ जुलै) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या धडकेत एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मृत शेतकऱ्याचे नाव वेचल तानसिंग जमरा (वय ४५, रा. टुनकी, ता. संग्रामपूर) असे असून, तो आपल्या शेतातील काम आटोपून पायदळ घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. अंधारात रेल्वे क्रॉसिंग ओलांडताना अचानक येणाऱ्या रेल्वेगाडीची जोरदार धडक बसल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून, पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, स्थानिक नागरिकांनी रेल्वे रुळ ओलांडताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.