
आत्महत्या – एकसाथ शेवटची वाट; नवरा-बायकोने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन
MH 28 News Live / चिखली : तालुक्यातील भरोसा गावात आज दुपारी एक अत्यंत दुःखद आणि हृदय हेलावणारी घटना समोर आली. गावाजवळील शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन गणेश थुट्टे व रंजना थुट्टे या नवरा-बायकोने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या दुहेरी आत्महत्येने संपूर्ण परिसरात हळहळ आणि शोककळा पसरली आहे.
घटना अंढेरा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात घडली असून, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार, दोघेही काही दिवसांपासून चिंतेत होते, मात्र त्यांनी अशा टोकाच्या निर्णयाचा मार्ग निवडेल याची कुणालाही कल्पना नव्हती. सध्या पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, आत्महत्येच्या पार्श्वभूमीमधील संभाव्य आर्थिक, कौटुंबिक किंवा मानसिक कारणांचा शोध घेतला जात आहे. थुट्टे दांपत्याच्या अचानक आणि एकत्रित मृत्यूने गावात शोकमग्न वातावरण असून, त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व गावकरी गहिवरून गेले आहेत.