
समृद्धी महामार्गावर व्यापाऱ्याच्या पावणे पाच किलो सोन्यावर दरोडा, चालकाच्या कटाने व्यापाऱ्याची लूट
MH 28 News Live / मेहकर : जलदगती प्रवासासाठी उभारलेल्या समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी मोठा थैमान घातल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. मुंबईकडे जाणाऱ्या व्यापाऱ्यास तब्बल पावणे पाच किलो सोने लुटण्यात आले असून, व्यापाऱ्याचा स्वतःचा चालकच या कटात सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
खामगाव येथून मुंबईकडे (क्र. एमएच ४३ बीयू ९५५७) किया कारने जात असताना व्यापारी अनिल शेशमल जैन चौधरी (रा. मुंबई) यांच्यावर ही घटना घडली. फरदापूर टोलनाका ओलांडल्यानंतर चालकाने पोटदुखीचा बहाणा करून गाडी थांबविण्यास सांगितले. चौधरी यांनी गाडी वळणावर उभी केल्याबरोबर मागून आलेल्या इनोव्हामधून चार ते पाच दरोडेखोर उतरले. त्यांनी व्यापाऱ्याच्या हातावर चाकू वार करून डोळ्यांत मिरचीपूड टाकली आणि कारमधील सोन्याची बॅग घेऊन इनोव्हामधून मालेगावच्या दिशेने पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, दरोडेखोरांची गाडी मालेगाव टोलनाका पार करून पातूरच्या दिशेने गेली. पोलिसांनी नाकाबंदी केली असता आरोपी गाडी सोडून जंगलातून पसार झाले. पुढील तपास मेहकर पोलिसांकडून सुरू आहे.
या घटनेनंतर समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याआधीही महामार्गावर इंधन चोरीच्या घटना तसेच ६६ लाखांचा गुटखा जप्तीची कारवाई झालेली आहे. आता व्यापाऱ्याची मोठी लूट झाल्याने महामार्ग प्रवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.