
आरटीओ ऑफिसात हाणामारी ! महिला अधिकाऱ्यांचा एजंटाला चोप, व्हिडिओ व्हायरल
MH 28 News Live / बुलढाणा : शहरात शुक्रवारी दुपारी घडलेल्या घटनेने परिवहन खात्याच्या कामकाजावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे केले आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) महिला मोटार वाहन निरीक्षक राजश्री चौधरी आणि एजंट सय्यद इरफान यांच्यातील वाद अखेर हाणामारीत परिवर्तित झाला. या घटनेचा थरारक व्हिडिओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
परस्परविरोधी तक्रारींनी वाढला पेच
घटनेनंतर शहर पोलिस ठाण्यात चौधरी आणि इरफान या दोघांनी एकमेकांविरुद्ध परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणाची खात्री करून घेतली. कोणत्या कारणावरून वाद निर्माण झाला, याबाबत मात्र अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. दोन्ही बाजूंनी ‘आम्हाला मारहाण झाली’ असा दावा करण्यात येत आहे.
प्रशासनाची प्रतिमा धोक्यात !
सरकारी कार्यालयातच महिला अधिकारी आणि एजंट यांच्यात राडा झाल्याने प्रशासनाच्या प्रतिमेवर मोठा डाग लागला आहे. नागरिकांच्या डोळ्यासमोर घडलेल्या या घटनेमुळे आरटीओ कार्यालयातील कारभार, एजंटांचा हस्तक्षेप आणि अधिकारी–एजंट संबंध यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष
सध्या पोलिस तपास सुरू असून, चौकशीदरम्यान सत्य उजेडात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, सरकारी यंत्रणेत घडलेला हा राडा हा केवळ वैयक्तिक वाद की भ्रष्टाचाराच्या जाळ्याचा भाग, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.