♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

समृद्धी महामार्गावर मृत्यूचा सिलसिला सुरूच… अपघातांच्या मालिकेत तरुणी ठार, दहा जण गंभीर

MH 28 News Live / सिंदखेडराजा : देशाच्या सर्वात वेगवान समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र काही थांबताना दिसत नाही. वेग, बेपर्वाई आणि निष्काळजीपणामुळे या महामार्गावर दररोज नवी दुर्घटना घडत आहे. बुधवारी पहाटे सिंदखेड राजा तालुक्यात दोन तर सोलापूर महामार्गावर एक असा एकूण तीन गंभीर अपघातांचा सिलसिला घडला. यात एका तरुणीचा मृत्यू झाला असून दहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

पहाटेच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू

बेंगळुरूहून मालेगावकडे निघालेल्या एका कारचा टायर बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास पिंपळखुटा परिसरात फुटला. त्यामुळे कार पहिल्या लेनमध्ये थांबवून प्रवासी खाली उतरले. त्याच वेळी मागून येणाऱ्या भरधाव कारने या उभ्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, सुहाना (वय १८) ही तरुणी पुलाखाली कोसळून जागीच ठार झाली. तर चालक नियाज पाशा (वय ४२, रा. बेंगळुरू) गंभीर जखमी झाला. धडक देणाऱ्या कारचा चालक किशोर कुमार (वय ४०, रा. सुरत) व त्याच्यासोबतचे पाच प्रवासी मात्र किरकोळ जखमी होऊन बचावले.

अडीच तासात दुसरा अपघात — ट्रकने फरफटली कार

पहिल्या अपघातानंतर अवघ्या अडीच तासांतच, म्हणजे पहाटे साडेचारच्या सुमारास खळेगावजवळ पुन्हा अपघात झाला. भरधाव ट्रकने समोर असलेल्या कारला जोरदार धडक दिली. धडक बसताच प्रदीप मुला (वय २६) आणि शिवानंद दास (वय ४०) हे रस्त्यावर फेकले गेले, तर ट्रक कारला ओढत काही मीटरपर्यंत फरफटत घेऊन गेला. या कारमधील सौरभ प्रधान (वय २१) व ओसरवरी दास (वय २४, दोघेही रा. भद्रक, ओडिशा) जखमी झाले. सर्व जखमींवर मेहकर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोलापूर महामार्गावर आणखी एक भीषण अपघात

समृद्धी महामार्गाच्या माळीवाडा इंटरचेंजजवळ धुळे-सोलापूर महामार्गावर आठ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता आणखी एक कार अपघात झाला. भरधाव कार उलटल्याने सात जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये जनार्दन माधवराव निंबाळकर (६०), छाया जनार्दन निंबाळकर (५५), पुष्पा नवनाथ तापकीर (४७), श्रद्धा संदीप हिवाळे (३४), उषा अशोक गोरे (५०), शोभाबाई कुंदनसिंग राजपूत (६७) आणि शालिनी शंकरराव माताडे (४७, सर्व रा. श्रद्धा कॉलनी, वाळूज महानगर) यांचा समावेश आहे.

जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने व जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेतून एमआयडीसी वाळूज येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघाताची नोंद दौलताबाद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

महामार्गावर सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेबाबतचे प्रश्न पुन्हा एकदा समोर आले आहेत. अतिवेग, झोपेची झपाटी, वाहने थांबविण्याची चुकीची पद्धत आणि अद्याप सुरू असलेले काही बांधकाम कार्य या सगळ्यामुळे हा महामार्ग “वेगाचा नाही तर भीतीचा” बनू लागला आहे. प्रवाशांनी सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129