
बालकांच्या हक्कांसाठी कायद्याचे कवच; न्यायाधीश एम. व्ही. पौळ यांचे चिखली अर्बन विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
MH 28 News Live / चिखली : बालकांचे सुरक्षित बालपण, त्यांचे हक्क व अधिकार यांचे संरक्षण करणे तसेच बालकांवरील अत्याचारांविषयी जनजागृती करून अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठविण्यास विद्यार्थ्यांना सक्षम करणे, हा ‘सुरक्षित बचपन अभियान’चा प्रमुख उद्देश असल्याचे प्रतिपादन न्यायाधीश श्रीमती एम. व्ही. पौळ यांनी केले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) यांच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या या अभियानांतर्गत तालुका विधी सेवा समिती, चिखली आणि चिखली वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी चिखली अर्बन विद्यानिकेतन येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीश एम. व्ही. पौळ यांनी विद्यार्थ्यांना बालकांचे मूलभूत हक्क, बालसुरक्षा, लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे महत्त्व समजावून सांगितले. अनोळखी व्यक्तींशी वागताना सतर्क राहावे, कोणतीही अनुचित घटना घडल्यास ती तत्काळ पालक किंवा शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्यावी आणि संकटाच्या प्रसंगी न घाबरता योग्य व्यक्तींची मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ (POCSO), सायबर गुन्हे, इंटरनेटचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणूक तसेच डिजिटल माध्यमांवरील संभाव्य धोक्यांविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बालकांवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार किंवा अन्याय झाल्यास तो सहन न करता संबंधित यंत्रणांकडे तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात आले. यावेळी चिखली वकील संघाच्या उपाध्यक्षा अॅड. राधिका मिनासे-गनोजेकर, अॅड. यशपाल बडगे, अॅड. वैशाली भंडारे, अॅड. रंजना पठ्ठे, अॅड. छाया काछ्ववाल, संस्थेचे अध्यक्ष सतीश गुप्ता, शैक्षणिक संचालिका डॉ. पूजा गुप्ता आणि विद्यालयाचे प्राचार्य गौरव शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. बालकांविरुद्ध घडणाऱ्या विविध गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे मत उपस्थित विधिज्ञांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ (POCSO), सायबर गुन्हे, इंटरनेटचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणूक तसेच डिजिटल माध्यमांवरील संभाव्य धोक्यांविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बालकांवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार किंवा अन्याय झाल्यास तो सहन न करता संबंधित यंत्रणांकडे तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात आले. यावेळी चिखली वकील संघाच्या उपाध्यक्षा अॅड. राधिका मिनासे-गनोजेकर, अॅड. यशपालजी बडगे, अॅड. वैशाली भंडारे, अॅड. रंजना पठ्ठे, अॅड. छाया काछ्ववाल, संस्थेचे अध्यक्ष सतीश गुप्ता, शैक्षणिक संचालिका डॉ. पूजा गुप्ता आणि विद्यालयाचे प्राचार्य गौरव शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. बालकांविरुद्ध घडणाऱ्या विविध गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे मत उपस्थित विधिज्ञांनी व्यक्त केले.
दरम्यान, तालुका विधी सेवा समितीच्या वतीने NALSA टोल-फ्री हेल्पलाइन, चाइल्ड हेल्पलाइन आणि सायबर क्राइम हेल्पलाइन क्रमांकांची माहिती असलेले जनजागृती फलक व बॅनर विद्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आले. त्यामुळे गरजेच्या वेळी विद्यार्थ्यांना मदत मिळविण्यासाठी आवश्यक संपर्क क्रमांक उपलब्ध होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मेघाली सकळकळे यांनी केले. या जनजागृती उपक्रमाला विद्यालयातील एकूण ७६४ विद्यार्थी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. बालकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासोबतच शोषणाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठविण्याचे बळ देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरला.



