
‘आंधळं दळतंय, कुत्रा पीठ खातंय!’ निकृष्ट धान्यावरून युवा सेनेचा उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांचा थेट सवाल; २३ डिसेंबरला तीव्र आंदोलनाचा इशारा
MH 28 News Live / चिखली : गोरगरीब जनतेला निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप करणाऱ्या जिल्हा पुरवठा विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात युवा सेना आता आक्रमक झाली आहे. युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर आणि विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख ओमराजे गायकवाड यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदन देत पुरवठा यंत्रणेवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
जनावरांनाही अयोग्य धान्य, माणसांना वाटप
युवा सेनेच्या मते, गेल्या वर्षभरात, विशेषतः नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यामध्ये शिधापत्रिकेवर वाटप झालेला तांदूळ आणि ज्वारी अत्यंत निकृष्ट दर्जाची होती. हे धान्य आळ्या, किडे, भुंगे आणि जाळे लागलेले असून ते जनावरांना खाण्यासाठीही अयोग्य असताना, पुरवठा विभागाने तेच धान्य गोरगरीब कुटुंबांना खाण्यासाठी दिले. “जिल्ह्यात अनेक कुटुंबे अशी आहेत, ज्यांना राशनच्या धान्याशिवाय पर्याय नाही. याच गोरगरिबांना हे सडलेले धान्य दिले गेले. गोरगरिबांची थट्टा करताना अधिकाऱ्यांना थोडी तरी लाज वाटायला हवी होती,” असे संतप्त मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे. ”पुरवठा विभागामार्फत वारंवार निकृष्ट धान्य देऊन करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला जातोय, हे आता उघड झाले आहे.”

‘यंत्रणा शासनाचा जावई आहे काय ?’
युवा सेनेने निकृष्ट धान्य पुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर आणि त्याला खपवून घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट हल्ला चढवला आहे. “हे धान्य पुरवणारी यंत्रणा कोणती? आणि त्या यंत्रणेला खपवून घेणारा अधिकारी शासनाचा व प्रशासनाचा जावई आहे काय ?” असा परखड प्रश्न त्यांनी विचारला आहे. या यंत्रणेवर व अधिकाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ न बसण्याचा इशारा युवा सेनेने दिला आहे.
धान्य नाही, पैसेही नाहीत !
यासोबतच, गेल्या दोन-तीन वर्षांपासून पुरवठा विभागाने गोरगरीब कुटुंबांकडून पैसे मिळतील असे सांगून फॉर्म भरून घेतले होते. मात्र, या लोकांना अद्याप ना धान्य मिळाले, ना त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. गोरगरीब लोक वारंवार पुरवठा विभागाच्या चकरा मारत आहेत, पण अधिकाऱ्यांकडून त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत.
युवा सेनेने मागणी केली आहे की, “एकतर धान्य द्यावे किंवा त्यांच्या खात्यामध्ये पैसे द्यावे आणि नेमकं घोडं कुठे अडलंय ते कधी मार्गी लागणार याचा किमान खुलासा करावा.”
२३ डिसेंबरला तीव्र आंदोलन
वरील सर्व मुद्द्यांची सखोल चौकशी करून तातडीने कारवाई न केल्यास, २३ डिसेंबर २०२५ रोजी प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा युवा सेनेने दिला आहे. या गंभीर आरोपांवर पुरवठा विभाग तातडीने काय भूमिका घेतो, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



