
ज्येष्ठ प्रचारक लक्खीदांचा त्यागमय जीवनप्रवास प्रेरणादायी – भैय्याजी जोशी सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा भव्यदिव्य वातावरणात संपन्न ; राष्ट्रीय पातळीवरील मान्यवरांची उपस्थिती
MH 28 News Live / चिखली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व सरकार्यवाह श्री. भैय्याजी जोशी यांनी चिखली येथे बोलताना, चिखलीचे ज्येष्ठ प्रचारक श्री. लक्ष्मीनारायण भाला उपाख्य लक्खीदा यांचे ८१ वर्षांचे त्यागमय, संघकार्याशी निगडीत आणि संघर्षमय जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले. दि. ६ व ७ डिसेंबर रोजी आयोजित लक्खीदा यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन समारंभाचा सोहळा भव्यदिव्य आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. या दोन दिवसीय सोहळ्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अखिल भारतीय प्रचारक प्रमुख स्वांत रंजनजी होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती लाभलेल्या मान्यवरांमध्ये श्रीनाथ पीठाचे पिठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज, राष्ट्र सेविका समितीच्या अ.भा. शारीरिक प्रमुख मनीषा संत, विद्याभारतीचे अ.भा. सह संघटन मंत्री श्रीरामजी आरावकर, वनवासी कल्याण आश्रमचे पूर्व महामंत्री कृपाप्रसाद सिंह, केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव, नागोरिया मठाचे प्रमुख स्वामी विष्णु प्रपन्नाचार्य महाराज, स्वामी शशीधराचार्यजी, ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक प्रवीण गुगनानी, ‘चाणक्य वार्ता’चे संपादक डॉ. अमित जैन यांचा समावेश होता. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरीजी महाराज यांचा शुभेच्छा संदेशाचा व्हिडिओ प्रेषित केला गेला. दि. ६ डिसेंबर रोजी झालेल्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार यांनी भूषवले, तर स्वांत रंजनजी यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

या वेळी उत्तर प्रदेशचे माजी शिक्षण मंत्री डॉ. रवींद्र शुक्ल, भारत रक्षा मंचचे संयोजक सूर्यकांत केळकर, आंतरराष्ट्रीय न्यायाधीश संघटनेचे अध्यक्ष डॉ. अतिशचंद्र अग्रवाल, गौडीया मिशनचे राधान्ती महाराज, महामंडलेश्वर गुरु माँ ममता दास यांच्यासह देशभरातील लक्खीदांचे अनेक समर्थक या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
अभिनंदन ग्रंथाचे लोकार्पण व सांस्कृतिक कार्यक्रम
ज्येष्ठांचे लेख, कविता आणि संदेशांनी सजलेल्या ‘लक्खीदा सहस्त्रचंद्रदर्शन अभिनंदन ग्रंथाचे’ लोकार्पण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. संपादक डॉ. अमित जैन यांनी ग्रंथनिर्मितीविषयी माहिती दिली.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुंबईच्या सुप्रसिद्ध ओडिसी नृत्य गुरू शुभदा वराडकर यांनी लक्खीदा लिखित नृत्यनाटिका ‘केशवकल्प’ चे देखणे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली. तसेच, सौ. शीतल भाला यांनी लक्खीदा यांचा ८१ वर्षांचा जीवनपट एका प्रभावी चलचित्राद्वारे उपस्थितांसमोर मांडला.
सत्काराला उत्तर देताना लक्खीदांनी आपल्या प्रचारक जीवनातील अनुभव थोडक्यात सांगितले. संघ विचार समाजात रुजविण्यासाठी त्यांनी अनेक वर्षांचा काळ पूर्णवेळ प्रचारक म्हणून दिला. राष्ट्रीय सेवाभावाचे व्रत घेऊन त्यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा ध्यास ठेवला. त्यांच्या कठोर परिश्रमातून अनेक ठिकाणी संघ कार्य विस्तारले, ज्यामुळे त्यांचे जीवन कार्यकर्त्यांसाठी एक आदर्श ठरले.
स्वागतगीते श्रीमती भागवती जाजू, वंदना अजमेरा. प्रासंगिक गीत अमोल चांगाडे यांनी गायले. आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. जुगल किशोर भाला यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. संपर्कप्रमुख शरद भाला यांनी उपस्थितांचे आभार मानले. सचिव सुधीर लंके आणि कविता लंके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
जनसंपर्कातून ठसवलेले हे दोन दिवसांचे ऐतिहासिक आयोजन चिखलीकरांसाठी एक वेगळीच आध्यात्मिक आणि संघात्म अनुभूती ठरले, अशी प्रतिक्रिया उपस्थित मान्यवर व नागरिकांनी व्यक्त केली.



