
सावधान…! तर तुमचं रेशनकार्ड रद्द होऊ शकतं; काळजी घ्या…!
MH 28 News Live : जर तुम्ही तुमच्या रेशन कार्डचा धान्य घेण्यासाठी वापर केला नसेल, तर तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत रेशनकार्ड धारक कुटुंबांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करुन दिलं जातं. यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कुटुंबातील सदस्य संख्येच्या आधारे सरकार लोकांना अत्यंत स्वस्त दरात रेशन पुरवते. गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करणं हा त्यामागचा उद्देश आहे

देशात बोगस रेशन कार्ड काढणाऱ्यांच्या संख्येत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसंच कार्ड सक्रिय न ठेवण्याचं प्रमाणही महाराष्ट्रात अधिक आहे. रेशन विभागात तुम्ही कोणत्या महिन्यात किती रेशन घेतलं आणि तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत अशी माहिती रेशन कार्डमध्ये मिळते. नियमांनुसार, पीडीएस अर्थात मध्ये तुम्हाला धान्य तेव्हाच मिळणार, जेव्हा तुमच्या नावावर रेशन कार्ड असेल. परंतु अशी काही प्रकरणं समोर आली आहे, ज्यात असे सर्व रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत, ज्यांचा वापर अधिक काळापासून झालेला नाही.
नियमानुसार, जर एखाद्या रेशनकार्ड होल्डरने मागील सहा महिन्यांपासून रेशन कार्डवर धान्य घेतलेलं नसेल, तर नियमांनुसार त्याला स्वस्तात मिळणाऱ्या धान्याची गरज नाही किंवा तो व्यक्ती स्वस्त दरातील धान्य घेण्यास पात्र नाही असा त्याचा अर्थ होतो. गरजूंना दोन वेळेच्या अन्नाची सोय व्हावी या उद्देशाने रेशन कार्डवर स्वस्त दरात धान्य दिलं जातं. परंतु दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या या सुविधेचा अनेक जण लाभ घेत नसल्याचं समोर आलं आहे. अशात अशा कारणांमुळे सहा महिन्यांहून अधिक काळ धान्य न घेतलेल्या व्यक्तीचं रेशन कार्ड रद्द केलं जाईल. दिल्ली, बिहार, झारखंडमध्ये हा नियम लागू आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर इथे हा निर्णय घेण्यात आला आहे.



