♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आषाढी वारीवरून परतणाऱ्या एसटी बसला अपघात; १७ वारकरी जखमी, जीवितहानी नाही

MH 28 News Live / चिखली : पंढरपूरची आषाढी वारी आटोपून विठ्ठलदर्शन करून परतणाऱ्या वारकऱ्यांच्या एसटी बसला आज (७ जुलै) पहाटे चिखलीजवळील मेहकर फाट्यासमोर भीषण अपघात झाला. भरधाव असलेल्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर आदळून उलटली. या दुर्घटनेत १७ वारकरी जखमी झाले असून सुमारे ३० जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

खामगाव आगाराची एसटी बस (क्र. एमएच ४० वाय ५८३०) पंढरपूरहून ५१ वारकऱ्यांना घेऊन परतत होती. पहाटे चारच्या सुमारास चिखली शहरातील महाबीज कार्यालयासमोर ही घटना घडली. रात्रीची वेळ असल्याने बसमधील अनेक प्रवासी झोपेत असतानाच हा अपघात झाला. बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, धडकेचा आवाज मोठा होता.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढून चिखली आणि बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींपैकी १७ जणांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. इतक्या भीषण अपघातानंतरही जीवितहानी टळल्याने सर्वत्र दिलासा व्यक्त केला जात आहे. “पांडुरंगाच्या कृपेने आम्ही सर्वजण वाचलो,” अशी भावना वारीतून परतणाऱ्या भाविकांनी व्यक्त केली. या अपघाताचा पुढील तपास ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनात चिखली पोलिस करीत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129