♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पिसाळलेल्या कुत्र्यांचा दहशतवाद; बुलढाण्यात ११ जणांना घेतला चावा, पायी चालणं धोकादायक

MH 28 News Live / बुलढाणा : शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून, 9 जुलैच्या दुपारी घडलेली घटना भयावह ठरली. हिरोळे पेट्रोल पंपाजवळ एका पिसाळलेल्या कुत्र्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीवर अचानक हल्ला चढवत चावा घेतला. विशेष म्हणजे, या एकाच कुत्र्याने एकूण अकरा जणांना चावा घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.सदर जखमी नागरिकाला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

रस्त्यांवर कुत्र्यांचे टोळके; नागरिकांच्या जीवाला धोका

शहरातील अनेक भागांमध्ये एकाच वेळी सात-आठ मोकाट कुत्र्यांची टोळकी फिरताना दिसत आहेत. दुचाकीस्वार, शाळकरी विद्यार्थी आणि पादचाऱ्यांसाठी हे दृश्य आता रोजचं बनलं आहे. कुत्र्यांचे हे झुंडीने फिरणे आणि अनपेक्षितपणे हल्ला करणे ही शहरातील गंभीर समस्या बनली आहे.

नगरपालिकेकडे कारवाईची मागणी

या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत नगरपालिकेकडून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. “एका कुत्र्याने अकरा जणांना चावा घेतल्यावरच जर प्रशासन जागं होणार असेल, तर आणखी किती जण जखमी व्हावेत?” असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.

सध्या शहरातील नागरिक रस्त्याने चालताना जीव मुठीत धरून जात आहेत. लवकरात लवकर पिसाळलेल्या आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.

प्रशासनाचे आवाहन

शहरातील जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनासाठी ही गंभीर जबाबदारीची वेळ आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीची कारवाई आणि मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण गरजेचे झाले आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि मनःशांती यासाठी आता कृती अनिवार्य आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129