
श्री मुंगसाजी माऊली मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
MH 28 News Live / चिखली : राजे संभाजीनगर, चिखली येथील परमपूज्यनीय मुंगसाजी माऊली निजी न्यास संचलित श्री मुंगसाजी माऊली मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तिरसात न्हालेला सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री गुरुपौर्णिमा महोत्सवाची सुरुवात श्री गुरुचरित्र पारायणाने झाली. दि. ५ जुलैपासून परिसरातील महिलांनी दररोज सकाळी ९ ते १२ या वेळेत अत्यंत भक्तिभावाने श्री गुरुचरित्र पोथीचे पारायण केले. त्यांच्या ओजस्वी पठणाने मंदिर परिसर अध्यात्मिक वातावरणाने भारावून गेला. मंदिर तसेच सदगुरू चरणदासजी गुरुमाऊली यांच्या समाधी मंदिराची सजावट गुलाब, निशिगंधा, शेवंती आणि झेंडूच्या रंगीबेरंगी फुलांनी करण्यात आली होती. या देखण्या फुलांच्या आरासेमुळे संपूर्ण मंदिर परिसर भारावलेल्या वातावरणाने न्हालेला दिसत होता.
बुलढाणा, जालना, अकोला, जळगाव खान्देश, वाशिम तसेच मोर्शी जिल्ह्यांतील असंख्य भाविकांनी दूरवरून येऊन श्री मुंगसाजी माऊलींच्या दर्शनाचा लाभ घेतला. मंदिर परिसरात भाविकांच्या ओसंडून वाहणाऱ्या गर्दीमुळे त्यांच्या मुखांतून “माऊलींचे चरणी वंदन” असेच शब्द सतत प्रकटत होते.
उत्सवाची सांगता दुपारी एक वाजता काल्याच्या कीर्तनाने झाली. कीर्तनातील आध्यात्मिक गोडीने उपस्थितांचे अंतःकरण तृप्त झाले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. भक्तजनांनी प्रसाद ग्रहण करत संत-माऊलींच्या कृपेसाठी प्रार्थना केली. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पार पडलेला हा सोहळा भक्तिभाव, अध्यात्मिक उत्साह आणि संतपरंपरेच्या उज्ज्वल तेजाने उजळून निघाला, अशी भावना अनेक भक्तांनी व्यक्त केली.