
आता गणेशोत्सवात रासायनिक गुलालाला कायमची बंदी; उत्पादन व साठवण करणाऱ्यांवर होणार कारवाई
MH 28 News Live / बुलढाणा : जिल्हा प्रशासनाने पर्यावरण रक्षण आणि मानवी आरोग्याचा विचार करून एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आगामी गणेशोत्सव काळात पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या रासायनिक गुलालाच्या वापरावर जिल्ह्यात कायमस्वरूपी बंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी शुक्रवारी आदेश जारी करताना स्पष्ट केले की, जिल्ह्यातील सर्व घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांना रासायनिक गुलालाचे उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वापर यास सक्त मनाई असेल.
या आदेशामुळे केवळ जिल्ह्यातील वातावरण आणि जलस्रोतांचे संरक्षण होणार नाही, तर नागरिकांच्या श्वसनासंबंधी व त्वचारोगांसारख्या आजारांपासूनही बचाव होईल. अनेकदा उत्सव काळात रासायनिक रंगांमुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच गंभीर त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घेतलेली ही कडक पाऊल सामाजिक आरोग्य व पर्यावरण संवर्धनासाठी एक आदर्श ठरणार आहे.
नागरिकांनी पारंपरिक पद्धतीचे, नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले गुलाल वापरून उत्सव साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नैसर्गिक गुलालामुळे निसर्गाचे रक्षण, स्वच्छ जलस्रोत आणि प्रदूषणमुक्त वातावरण यासाठी मोठी मदत होणार आहे. हा निर्णय केवळ एका जिल्ह्यासाठी मर्यादित नसून संपूर्ण समाजासाठी एक विधायक संदेश आहे. उत्सव म्हणजे आनंद, पण तो आनंद निसर्गाशी सुसंवाद साधताच खऱ्या अर्थाने टिकाऊ ठरतो.