
थेट कर्ज योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन
MH 28 News Live, बुलडाणा : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादितच्या थेट कर्ज योजनेतून कर्ज मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्हा कार्यालयास सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता थेट कर्ज योजनेचे 20 उद्दिष्ट असून थेट कर्ज योजनेचे प्रस्ताव जिल्ह्यातील मातंग समाजातील 12 पोटजातीतील इच्छुक अर्जदाराकडून मागविण्यात आले आहेत.
यासाठी कर्जाचे अर्ज दि. 26 डिसेंबर 2022 ते दि. 24 जानेवारी 2023 पर्यंत दिले जातील. यात पुर्ण भरलेले कर्ज स्विकारले जातील. प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपये, आर्थिक उद्दिष्ट 20 लाख रूपये आहे. जिल्ह्यातील मांग, मातंग समाजातील इच्छुक अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे. वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. अर्जदाराने यापुर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. नियमाप्रमाणे आवश्यक त्या कगदपत्राची पुर्तता करुन कर्ज प्रस्ताव दोन प्रतीत जिल्हा कार्यालयात स्वत: अर्जदाराने मुळ कागपदत्रासह उपस्थित राहून दाखल करावेत. त्रयस्थ, मध्यस्थांमार्फत कर्ज प्रकरण स्विकारण्यात येणार नाहीत.
कर्ज प्रकरणासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, दोन फोटो, व्यवसायाचे दरपत्रक, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचे आहे, त्या ठिकाणची भाडेपावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा (घर टॅक्स पावती), ग्रामपंचायत, नगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र किंवा शॉप ॲक्ट परवाना, व्यवसाय संबंधित तांत्रिक प्रमाणपत्र, शैक्षणिक दाखला, अनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र, अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोर किमान 500 असावा, अर्जदाराने आधार कार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा. कर्ज प्रकारणासोबतची सर्व कागदपत्रे स्वत:च्या स्वाक्षरीने साक्षांकित करावीत.
योजनेतील कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यातील अर्ज दि. 24 जानेवारी 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे अर्ज मिळतील आणि स्विकारले जातील. अंतिम तारीखेनंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी कळविले आहे.