
मोठं मन दाखवत उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद दिलं – अजीत पवार यांनी सांगितली पडद्यामागची कहाणी
MH 28 News Live : महाविकास आघाडीच्या प्रयोगात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद दिलं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे सर्वाधिक संख्याबळ असल्याने उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिल्याचं सांगितलं जात होतं.
मात्र, त्याकाळात पडद्यामागे घडलेल्या घडामोडींवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतची वेगळीच माहिती दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आपण निवडून आलो. पक्ष मोठा असला तरी उद्धव ठाकरेंकडे मोठ मन दाखवत मुख्यमंत्रीपद दिलं होतं. कारण जनतेसाठी काम करायचं होतं, असा गौप्यस्फोट करतानाच आता विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे आहे. तरुणाची टीम आपल्याकडे आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं. नागपुरात कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी हे भाष्य केलं. त्यामुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.
शरद पवार साहेब म्हणतात, आपल्याला सीनियर नेते तर पाहिजेच. पण तरुण रक्त शुद्ध पाहिजे. प्रामाणिक असणारा कार्यकर्ता पाहिजे. त्याची निवड योग्य झाली पाहिजे. मोठा हार घालणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा निष्ठावान कार्यकर्ता पाहिजे. कार्यकर्ते कमी असतील तरी चालेल पण निष्ठावान पाहिजे, असं सांगतानाच ग्रामपंचायतीत आपण मोठं यश मिळविल्याचंही सांगितलं.