
चोरीस गेलेले २२ मोबाईल परजिल्ह्यांतून जप्त; मूळ मालकांच्या स्वाधीन, बुलढाणा पोलिसांची कामगिरी
MH 28 News Live / बुलढाणा : शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून चोरीस गेलेले मोबाईल फोन शोधण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले असून, तब्बल २२ मोबाईल जप्त करून ते १४ जून रोजी त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, या मोबाईलचा माग काढताना जळगाव, अकोला, जालना या परजिल्ह्यांपर्यंत तपासाची व्याप्ती पोहोचली. काही मोबाईल अनोळखी तरुणांकडून स्थानिकांनी विकत घेतले असल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांच्या तपासासाठी शहर पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली होती. पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास पुढे नेला.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर ठाणेदार रवि राठोड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पथकात पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे, हेड कॉन्स्टेबल संदीप कायंदे, कॉन्स्टेबल युवराज शिंदे, विनोद बोरे, मनोज सोनूने, कौतुक बोर्डे आणि विशाल बनकर यांचा समावेश होता. मोबाईल चोरीप्रकरणी पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.