
म्हणून पोलीस पाटलांवर आले आर्थिक संकट; कारण नेमके कोणते ते वाचा !
MH 28 News Live / बुलढाणा : गावातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या पोलिस पाटलांची सध्या आर्थिक घुसमट सुरू आहे. मागील तीन महिन्यांपासून त्यांचे मानधन रखडले असून, त्यामुळे पाटलांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेष बाब म्हणजे, महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने दिनांक १५ मे रोजीच पोलिस पाटलांना मानधन देण्यासाठी ७८.१२ कोटी रुपयांचा निधी बीडीएस प्रणालीवर उपलब्ध करून दिला आहे. तसेच, हा निधी तात्काळ वितरित करण्याचे स्पष्ट आदेश पोलिस प्रशासनास देण्यात आले होते.
तरीसुद्धा जिल्ह्यातील पोलिस पाटील अजूनही मानधनापासून वंचित आहेत. या दिरंगाईमुळे पोलिस पाटलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गावागावात याचा निषेध होत असून, शासनाच्या यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना पोलिस पाटलांमध्ये निर्माण झाली आहे.
शासनाच्या पातळीवर निधी उपलब्ध असूनही वितरणात होत असलेल्या विलंबामुळे हा विषय अधिक गहिरा झाला आहे. पोलिस पाटील हा गावातील प्रशासनाचा एक महत्त्वाचा दुवा आहे आणि त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे गावगाड्याच्या व्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने निधी वितरण करून पाटलांचा विश्वास पुनःप्रस्थापित करावा, अशी मागणी सर्वत्र होत आहे.