
बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला मोठे यश; एकाच महिन्यात २४ बालविवाह उधळले !
MH 28 News Live / बुलढाणा : जिल्ह्यात बालविवाहाची कुप्रथा रोखण्यासाठी महिला व बाल विकास विभाग आणि पोलीस प्रशासनाने अत्यंत धडक कारवाई केली आहे. चाईल्ड हेल्पलाइन १०९८ आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बुलढाणा यांच्या संयुक्त प्रयत्नातून मागील अवघ्या एका महिन्यात जिल्ह्यातील तब्बल २४ संभाव्य बालविवाह रोखण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे. या धडक मोहिमेमुळे जिल्ह्यात बालविवाह करणाऱ्यांचे आणि त्याला प्रोत्साहन देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर
जिल्ह्यात बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच प्रशासनाने विविध यंत्रणांच्या समन्वयातून “ॲक्शन मोड”मध्ये काम करत ही प्रभावी कारवाई केली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे तसेच बालकल्याण समितीचे अध्यक्ष मनोज डांगे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली.

यंत्रणांचा चोख समन्वय आणि कारवाई
चाईल्ड हेल्पलाइन बुलढाणा टीममधील प्रकल्प समन्वयक, समुपदेशक विद्या खरे, पर्यवेक्षक सागर नरवाडे, केस वर्कर प्रवीण गवई, मुकेश मोरे व राहुल सुरडकर यांनी गावपातळीवर जाऊन ग्राम बाल संरक्षण समिती, ग्रामसेवक, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, अंगणवाडी सुपरवायझर तसेच संबंधित पोलीस ठाण्यांशी तात्काळ संपर्क साधला.

कुठूनही तक्रार प्राप्त होताच चाईल्ड हेल्पलाइन पथकाने एका क्षणाचाही विलंब न लावता थेट घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हेल्पलाइन ११२, ग्रामीण व शहरी भागातील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आणि अंगणवाडी यंत्रणेला सोबत घेऊन हे बालविवाह रोखण्यात आले. केवळ विवाह थांबवून हे पथक थांबले नाही, तर संबंधित अल्पवयीन मुलींचे आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन करून त्यांना बालविवाह प्रतिबंधक कायदा व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
तालुकानिहाय रोखलेले बालविवाह
जिल्ह्यात सर्वाधिक ५ बालविवाह चिखली तालुक्यात रोखण्यात आले. संपूर्ण जिल्ह्याची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. चिखली ५, देऊळगाव राजा ४, सिंदखेड राजा ४, लोणार ३, मेहकर २, मोताळा २, बुलढाणा २, मलकापूर १, खामगाव १; एकूण २४
बालविवाह हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. नागरिकांना कुठेही बालविवाह होत असल्याचे आढळल्यास त्यांनी तात्काळ चाईल्ड हेल्पलाइन १०९८ किंवा पोलीस हेल्पलाइन ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



