♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

राजुरा धरणात थरारक दुर्घटना; चार चिमुकल्यांसह वडिलांचा विहिरीत मृत्यू

MH 28 News Live / जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसर सोमवारी एका हृदयद्रावक आणि थरारक घटनेने अक्षरशः हादरून गेला. एका विहिरीत वडील आणि त्यांच्या चार लहान मुलांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, घरगुती वाद आणि मानसिक तणावातून संतप्त झालेल्या पित्याने आधी आपल्या चार निष्पाप मुलांना विहिरीत ढकलून दिले आणि त्यानंतर स्वतःही उडी घेत आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृत व्यक्तीची ओळख विजय मुसा किराडिया अशी असून ते जळगाव जामोद तालुक्यातील भाले अंजन गावचे रहिवासी होते. या भीषण घटनेत प्रित, प्राची, पूर्वी आणि पियुष या चार चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय किराडिया यांचा पत्नीशी काल घरगुती वाद झाला होता. त्यानंतर पत्नी माहेरी गेल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी सकाळी विजय यांनी पत्नीला माहेरी सोडले होते. त्यानंतर गावाकडे परतताना त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सकाळी घरी परतल्यानंतर वडिलांनी पत्नीबाबत विचारणा केल्याने पुन्हा वाद निर्माण झाला होता, अशी माहिती समोर येत आहे. त्यानंतर विजय किराडिया आपल्या चारही मुलांना घेऊन राजुरा धरण परिसरात गेले. काही वेळानंतर ते सर्व बेपत्ता झाल्याची माहिती गावात पसरली. स्थानिकांनी शोध घेतला असता धरणाजवळील विहिरीत पाचही जणांचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस, महसूल प्रशासन आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे भाले अंजन गावासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, घरगुती कलह आणि मानसिक तणाव किती भीषण रूप धारण करू शकतो याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129