♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बेपत्ता वडिलांचा शोध घेताना उघड झाला थरार; तक्रारदार मुलगाच निघाला जन्मदात्याचा मारेकरी !

MH 28 News Live / बुलढाणा : तालुक्यातील हतेडी खुर्द येथे अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून, वडील बेपत्ता असल्याची तक्रार देणारा मुलगाच त्यांच्या खुनाचा सूत्रधार असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. जन्मदात्या वडिलांची हत्या करून त्यांचे प्रेत घराजवळील शेतात जाळणाऱ्या आरोपी मुलाला बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हतेडी खुर्द येथील शेतकरी समाधान पुंजाजी घायवट (४४) हे ८ मेपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचा मोठा मुलगा अनिकेत घायवट (२१) याने बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर अनिकेतच्या हालचाली व देहबोली संशयास्पद वाटू लागली. त्यामुळे पोलिसांनी अधिक सखोल चौकशी सुरू केली.

तपासादरम्यान पोलिसांना समजले की, घटनेच्या दिवशी कुटुंबातील इतर सदस्य नातेवाईकांच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. घरात फक्त समाधान घायवट आणि त्यांचा मुलगा अनिकेत हे दोघेच उपस्थित होते. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, झटापटीदरम्यान अनिकेतने वडिलांच्या छातीवर जोरदार लाथ मारली. त्यात समाधान घायवट जागीच कोसळले व त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर घाबरलेल्या अनिकेतने खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच रात्री वडिलांचे प्रेत घराजवळील शेतात नेऊन जाळून टाकल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर जणू काही घडलेच नाही अशा आविर्भावात त्याने कुटुंबीयांची दिशाभूल करत वडील बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.

दरम्यान, बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी संशयाच्या आधारे अनिकेतला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. “आपणच वडिलांचा जीव घेतला आणि प्रेत जाळून टाकले,” अशी कबुली त्याने पोलिसांसमोर दिली. या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी आरोपी अनिकेत घायवट याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129