
स्वतःच्या लेकरीसारखी सून… सासू-सासर्यांनी लावून दिला विधवा सुनेचा पुनर्विवाह
MH 28 News Live / संग्रामपूर : एका सूनबाईचे आयुष्य अंधारात गेले होते… पतीच्या अचानक मृत्यूनंतर प्रत्येक दिवस जणू तिच्यासाठी दुःखाचं दान बनून उरला होता. पण अशा काळोखातून तिला हात देत बाहेर काढलं तिच्या सासरच्यांनी – सासू-सासऱ्यांनी! समाजासमोर सासरकडील नात्याची नवी व्याख्या उभी करणारी ही गोष्ट लाडणापूर (ता. संग्रामपूर) येथे घडली आहे.
येथील धोंडीराम जामोदे यांची कन्या स्वाती. तारुण्यात नशिबी वैधव्य आलेल्या स्वातीचे नव्याने कन्यादान करत, तिच्या सासू-सासऱ्यांनी ना फक्त तिच्या भविष्याची जबाबदारी घेतली, तर आपली संपूर्ण संपत्ती देखील तिच्या नावावर केली. या माणुसकीच्या ठिणग्यांनी समाजाच्या काळजालाच स्पर्श करून गेला आहे.
स्वातीचा विवाह २०१३ साली गावातीलच जगदीश केशवराव धनभर या सधन शेतकऱ्याशी झाला होता. भक्ती आणि प्रसाद या दोन मुलांसह सुखाचं आयुष्य सुरू असतानाच १३ ऑगस्ट २०२३ रोजी विजेचा धक्का लागून जगदीश यांचं अकाली निधन झालं. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, पण सासू-सासऱ्यांनी फक्त सून म्हणून नव्हे, तर एक मुलगी म्हणून तिच्या भविष्याचा विचार केला. २ जून २०२५ रोजी अकोट तालुक्यातील किनखेड पूर्णा येथे, कुटुंबीयांच्या उपस्थितीत स्वातीचा दुसरा विवाह साजरा झाला.
या विवाहात सर्वांत महत्त्वाचं होतं ते कन्यादान… आणि ते केलं होतं सासू-सासऱ्यांनी! हे फक्त सामाजिक संकेतांचं उल्लंघन नव्हतं, तर एक जिवंत उदाहरण होतं की, खऱ्या अर्थाने ‘सून’ म्हणजे दुसरी ‘लेकरू’च असते. धनभर कुटुंबाच्या या उदार आणि माणुसकीच्या निर्णयामुळे समाजात एक नवा आदर्श उभा राहिला आहे. सासरकडून मिळालेल्या आधाराने स्वातीचं आयुष्य पुन्हा नव्यानं फुलू लागलं आहे – नव्या आशेने, नव्या प्रकाशाने!
जेव्हा घर म्हणजे फक्त नात्यांचा धर्म नसतो, तर माणुसकीचा आधार असतो, तेव्हा कोणाचंही आयुष्य पुन्हा फुलू शकतं. सासू-सासऱ्यांनी घेतलेले हे पाऊल समाजाला माणुसकीची खरी ओळख करून देतं.