
ब्रेकिंग न्यूज… खामगाव – जालना नवीन रेल्वेमार्गासाठी भूमी संपादनाची प्रक्रिया वेगात; बुलढाणा जिल्ह्यात सक्षम प्राधिकरण नियुक्तीची तयारी
MH 28 News Live / चिखली : प्रस्तावित खामगाव – जालना (१६२ कि.मी.) नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी भूमी संपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, या प्रकल्पासाठी सक्षम प्राधिकरण (Competent Authority) नियुक्त करण्याबाबत मध्य रेल्वेने बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. भूमी संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रेल्वेमार्गाच्या प्रत्यक्ष कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंता (बांधकाम)-२ किशोर सिंह यांनी ४ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रानुसार, रेल्वे मंडळाने यापूर्वी जालना–खामगाव नवीन ब्रॉडगेज मार्गाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणाला (Final Location Survey) मंजुरी दिली होती. त्यानंतर रेल्वे (दुरुस्ती) अधिनियम, २००८ अंतर्गत या प्रकल्पाला विशेष रेल्वे प्रकल्प (Special Railway Project) म्हणून घोषित करण्यात आले असून, त्याची अधिसूचना भारत सरकारच्या राजपत्रात २६ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, ‘न्याय्य भरपाई व पारदर्शकता, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापन अधिनियम, २०१३’ अंतर्गत भूमी संपादनास मोठा कालावधी लागत असल्याने रेल्वे प्रशासनाने हा प्रकल्प रेल्वे (दुरुस्ती) अधिनियम, २००८ अंतर्गत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भूमी संपादनाची प्रक्रिया तुलनेने अधिक वेगाने पूर्ण होणार आहे.
या गावांमध्ये होणार सर्वेक्षण
प्रस्तावित रेल्वेमार्ग बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, चिखली, खामगाव आणि शेगाव तालुक्यांतील या गावांमधून रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील भिवगाव बुद्रुक, सावखेड भोई, पिंपळनेर, गिरोली खुर्द, आंभोरा, बोराखेडी बावरा, पळसखेड झाल्टा, आसोला (प्र. सिंदखेड), बामखेड, पिंपळगाव बुद्रुक, सवंगी टेकाडे, निमगाव गुरु, देऊळगाव मही, सारंबा, धोत्रा, मलकापूर पांग्रा आणि अंधेरा; सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा, उगळा, जळगाव, आसोला (प्र. खेरडा), चिखली तालुक्यातील भोरसा, मेरा खुर्द, रोहडा, कोलारा, खंडाळा मकरध्वज, शिंदी हराळी, बोरगाव वासू, अन्वी, पेठ, बोरगाव काकडे, दहिगाव, महिमाळ, टाकरखेड ( मुसलमान ), आमडापूर, मोहदरी, तोरणवाडा, किन्ही सवडद, उंद्री आणि वैरागड; चिखली तालुक्यातील निमखेड, गणेशपूर (महारखेड), शिराळा, पाळा तर खामगाव तालुक्यातील लोखंडा, नायदेवी, किन्ही महादेव, नागापूर, जळका तेली, जानुना, तेंभूर्णा, शेळोदी आणि जयपूर; आणि शेगाव तालुक्यातील लोंढे, वरखेड खुर्द आणि पाथरजीरा या गावांचा समावेश आहे.
सहायक जिल्हाधिकारी यांच्याकडे सक्षम प्राधिकरणाची जबाबदारी
रेल्वे (दुरुस्ती) अधिनियम, २००८ मधील कलम २(७-अ) नुसार भूमी संपादनासाठी सक्षम प्राधिकरण नियुक्त करणे बंधनकारक आहे. त्यानुसार बुलढाणा येथील सहायक जिल्हाधिकारी तथा भूमी संपादन अधिकारी यांची संबंधित गावांसाठी सक्षम प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून गावनिहाय नियुक्तीला मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून, त्यानंतर भूमी संपादनाची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे जालना–खामगाव नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.



