
पेपरफुटी, गैरव्यवहार विरुध्द राष्ट्रवादी आक्रमक शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांचे निवेदन
MH 28 News Live / देऊळगाव राजा : देशभरात नीट,जी, यूपीएससी सह विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने तहसील कार्यालय येथे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन निदर्शने देण्यात आले.यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले.
राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, संपूर्ण राज्यसह देशात स्पर्धा परीक्षांचे वारंवार होणारी पेपर फुटी, भरती प्रक्रियातील कथित गैरव्यवहार, ऑनलाइन परीक्षा व्यवस्थित गंभीर त्रुटी आणि पोलीस भरती प्रक्रियेतील कथित अन्याय यामुळे विद्यार्थी व तरुण वर्गामध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या दोषींवर व संस्थांवर कठोर कारवाई करण्याऐवजी सरकार या सर्व गंभीर बाबींकडे उदासीन भूमिकेतून पाहत असल्याचे चित्र आहे. देशातील व राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या हितासाठी व न्याय मागण्यासाठी सोनम वांगचुक यांनी केलेल्या उपोषण आंदोलनाला देखील या सरकारने कोणतीही ठोस दात दिलेली नाही. उलट आपल्या न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी क्रूर आणि निष्ठूर पद्धतीने जी मारहाण केली, ती अत्यंत वेदनादायी असून ही घटना लोकशाही मूल्यांना काळिमा फासणारी होती. स्पर्धा परीक्षांच्या तणावामुळे व अन्यायामुळे देशातील 20 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलेली असतानाही, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारलेली नाही. त्यामुळे समाजसेवक सोनम वांगचुक यांनी उपस्थित केलेल्या राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांना पाठिंबा देत,केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, पेपरफुटी प्रकरणांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नीट, जेईई, युजीसी-नेट, टीईटी, आयबीपीएस व इतर पेपरफुटी प्रकरणांची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,एमपीएससी तसेच महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षा ऑफलाईन, सुरक्षित व पारदर्शक पद्धतीने घेण्यात याव्यात, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा व सक्षम सुरक्षा यंत्रणा लागू करावी.अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश इंगळे, तालुकाध्यक्ष मन्नान पठाण, सुधाकर मस्के, गणेश सवडे,शिवाजी कोल्हे, किसन लंके, नगरसेवक शिवाजी मेहेत्रे, रामा मस्के, मनसेचे बंडू डोळस,संजय दहातोंडे काकासाहेब म्हस्के, नवनाथ रामाने त्यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



