♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पेपरफुटीविरोधात खामगाव पेटणार!; २१ जुलैला ‘शिक्षण बंद’ची हाक, सोनम वांगचूक यांच्या आंदोलनालाही विद्यार्थ्यांचा जाहीर पाठिंबा

 

MH 28 News Live / खामगाव : राज्यात सातत्याने उघड होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेल्या खेळाविरोधात आता खामगावमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा निषेध करत विद्यार्थी कृती समिती, खामगाव यांनी २१ जुलै २०२६ रोजी ‘शिक्षण बंद’ आंदोलनाची हाक दिली असून, या आंदोलनाला व्यापक प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यासंदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी, गट शिक्षणाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला निवेदन सादर केले. या निवेदनात खामगाव शहरासह तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे, संगणक प्रशिक्षण संस्था, अभ्यासिका, ग्रंथालये आणि शिक्षणाशी संबंधित सर्व संस्थांनी स्वेच्छेने बंद ठेवून विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

समितीने निवेदनात पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच सर्व प्रकरणांची जलदगती न्यायालयात सुनावणी, परीक्षा प्रक्रियेत अत्याधुनिक व पारदर्शक यंत्रणा लागू करणे, दोषी अधिकारी व संस्थांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकणे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतेही संरक्षण न देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

दरम्यान, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक नागरिकांच्या हक्कांसाठी आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला व उपोषणालाही विद्यार्थी कृती समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांच्या न्याय्य मागण्यांवर केंद्र शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

या प्रसंगी विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवेदनावर बंटी गव्हांदे, रितेश चोपडे, अक्षय हातेकर, सौरभ रिचारिया, शुभम राऊत, यश पैठणकर, ऋषी सपकाळ, अविनाश कोकाटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

“विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. शासनाने तातडीने ठोस निर्णय घेतला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा विद्यार्थी कृती समितीने दिला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129