
ओमराजे गायकवाड यांच्या आंदोलनाला यश; पळसखेड दौलतच्या पाणीप्रश्नाला दिलासा
MH 28 News Live / चिखली : गेल्या नऊ महिन्यांपासून तालुक्यातील पळसखेड दौलत येथील रखडलेल्या जलजीवन मिशनच्या कामाला अखेर गती मिळाली असून पळसखेड दौलत गावाच्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना विद्यार्थी सेनेचे चिखली तालुकाप्रमुख ओमराजे मदनराजे गायकवाड यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर व आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत जलजीवन मिशनचे रखडलेले काम युद्धपातळीवर सुरू केले.
गावात गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. नागरिकांना तब्बल २०-२० दिवस पाण्याची प्रतीक्षा करावी लागत होती, तर महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती. अर्धवट व निकृष्ट दर्जाचे काम करून कंत्राटदाराने काम बंद केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत होता. दरम्यान, १५ जून रोजी ओमराजे गायकवाड यांनी संबंधित कार्यालयात जाऊन उपोषण व तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. संबंधित कंत्राटदाराला कामाच्या ठिकाणी बोलावून रखडलेले काम पुन्हा सुरू करण्यात आले.
मुख्य पाईपलाईन पूर्ण; टाकीत पाणी पोहोचले
पाठपुराव्यामुळे कोनाड धरणातून गावाकडे येणाऱ्या मुख्य पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून गावातील पाण्याच्या टाकीत पाणी पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात मात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जलजीवन मिशनचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
२७ जुलैपर्यंत उर्वरित काम पूर्ण करण्याची मागणी
योजनेअंतर्गत कोनाड विहिरीवर पाणी उपशाचा पंप बसविण्याचे काम अद्याप बाकी आहे. हे काम २७ जुलै २०२६ पर्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून गावात नियमित २४ तास पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ओमराजे गायकवाड यांनी प्रशासनाकडे केली आहे. निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.



