♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

साडेआठ लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी २५ हजारांची लाच; जळगाव जामोद पंचायत समितीतील विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

MH 28 News Live / जळगाव जामोद : जळगाव जामोद पंचायत समितीतील लाचखोरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, साडेआठ लाख रुपयांचे बिल मंजूर करून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना विस्तार अधिकारी संदीप मोरे यांना अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई थेट पंचायत समितीच्या कार्यालयातच झाल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराचे सुमारे ८ लाख ५० हजार रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी विस्तार अधिकारी संदीप मोरे यांनी बिलाच्या रकमेच्या ३ टक्के इतक्या लाचेची मागणी केली होती. लाचेची मागणी होताच तक्रारदाराने अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी करून लाचेच्या मागणीची खातरजमा केली.

यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी जळगाव जामोद पंचायत समिती कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे संदीप मोरे यांनी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. सरकारी कार्यालयातच झालेल्या या कारवाईमुळे पंचायत समितीतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून, या घटनेची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.

या प्रकरणी विस्तार अधिकारी संदीप मोरे यांच्याविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील तपास सुरू असून, प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129