♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शेलगाव जहांगीर जातीवाचक अत्याचार प्रकरणी आरोपींना दिलासा नाही; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

MH 28 News Live / चिखली : शेलगाव जहागीर येथे अनुसूचित जातीच्या महिलेवर व तिच्या मुलीवर कथित जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन मुख्य आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रकरणाच्या तपासाला बळ मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० जून २०२६ रोजी शेलगाव जहागीर येथे सौ. उषा रमेश साळवे व त्यांच्या मुलीवर जातीवाचक शिवीगाळ करत अमानुष मारहाण झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी किसन सुखदेव शिराळे आणि शिवाजी किसान शिराळे यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज बुलढाणा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने १६ जुलै २०२६ रोजी नामंजूर केला.

फिर्यादीच्या वतीने ॲड. राजेश जाधव व ॲड. अंबादास जाधव यांनी विविध न्यायनिवाड्यांचा आधार घेत न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. अरुण गवई, ॲड. विद्याधर गवई आणि ॲड. शंकर चव्हाण यांनी सहकार्य केले. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता भटकर यांनी बाजू मांडली.

न्यायालयाच्या निर्णयानंतर पीडितेला न्याय मिळण्याच्या प्रक्रियेला बळ मिळाल्याची भावना सामाजिक स्तरावर व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि वेगाने पूर्ण करून न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, अशी अपेक्षा विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून आरोपींवरील आरोपांची अंतिम सत्यता न्यायालयीन प्रक्रियेनंतरच निश्चित होणार आहे. न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ ठेवत पीडितेला न्याय मिळावा आणि कायद्याचे राज्य अबाधित राहावे, अशी मागणीही यानिमित्ताने पुढे आली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129