♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जिल्ह्यात पावसाचे रौद्ररूप; मेहकर-लोणारमध्ये पूरस्थिती, पिकांचे मोठे नुकसान, जनजीवन विस्कळीत

MH 28 News Live / बुलढाणा : पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांना दमदार पावसाने दिलासा तर मिळाला, पण काही भागांत या पावसाने अक्षरशः हाहाकार घातला आहे. बुधवारी सायंकाळपासून सुरु झालेल्या कोसळधार पावसाने गुरुवारी मेहकर आणि लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण केली.

या मुसळधार पावसामुळे अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, नुकत्याच झालेल्या पेरण्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले असून, काही ठिकाणी घरात पाणी शिरल्याने अन्नधान्य व घरगुती साहित्याचेही नुकसान झाले आहे.

गुरुवारी सकाळी ८.३० वाजता संपलेल्या मागील २४ तासांत बुलढाणा तालुक्यात ७३ मिमी, चिखलीत ७० मिमी, लोणार तालुक्यात ८२ मिमी, सिंदखेड राजा तालुक्यात ५० मिमी आणि देऊळगाव राजा तालुक्यात ३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः मेहकर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता.

मेहकर तालुक्यातील पांगरखेड येथील घनश्याम सुर्वे यांच्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घरातील १५ टिनपत्रे व घरगुती साहित्याचे नुकसान झाले आहे. मेहकरच्या जानेफळ परिसरात पावसाचा मोठा मारा झाला असून, गावालगतच्या नाल्याला पूर आल्याने प्रसिद्ध शेगाव-पंढरपूर पालखी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. गेले दोन तास या मार्गावर वाहनांची गर्दी व यात्रेकरूंना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

लोणार तालुक्यातील सुलतानपूर परिसरातही जोरदार पावसाचा कहर सुरू असून, शेतजमिनी आणि रस्ते जलमय झाले आहेत. काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला आहे. नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मेहकर उपविभागातील बोरखेडी तलावाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. तलाव ७५ टक्क्यांहून अधिक भरल्याने लवकरच सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच, पशुधन, शेती अवजारे व इतर आवश्यक वस्तू सुरक्षित स्थळी हलवण्यास सांगितले आहे.

प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणा सज्ज असून, नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेतला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अधिकृत अंदाज अद्याप उपलब्ध नाही.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129