
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रभाग रचनेसाठी काटेकोर कार्यवाही झाली सुरू
MH 28 News Live / बुलढाणा : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील प्रभाग रचनेची प्रक्रिया गतिमान झाली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ अंतर्गत व ग्रामविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या आदेशानुसार बुलढाण्यात ६१ जिल्हा परिषद निवडणूक विभाग व १२२ पंचायत समिती प्रभागांचे पुनर्रचना प्रस्तावित आहेत.
या प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी २० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात महत्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, प्रभारी तहसीलदार शशिकांत वाघ व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान प्रधान सचिव डवले यांनी १२ जून रोजी ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या आदेशाचा संदर्भ देत, प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना १४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. नागरिकांना आपली हरकती व सूचना २१ जुलै पर्यंत लेखी स्वरूपात सादर करता येणार आहेत.
प्राप्त हरकतींचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी २८ जुलै पर्यंत प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. त्यानंतर ११ ऑगस्ट पर्यंत सुनावणी पूर्ण करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. ही अंतिम प्रभाग रचना १८ ऑगस्ट पर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली जाणार आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून पारदर्शक व नियमबद्ध रितीने पार पाडावी, अशी स्पष्ट सूचना प्रधान सचिवांनी यावेळी केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निष्पक्षता आणि कायदेशीर प्रक्रिया अबाधित राहावी, यासाठी शासन अत्यंत काटेकोरपणे भूमिका बजावत असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.