
‘शिरविरहित’ हत्याकांडाने जिल्हा हादरला ! ४५ दिवसांनंतरही तरुणीची ओळख गूढच राजुरा शिवारात सापडला शिरविरहित मृतदेह
MH 28 News Live / जळगाव जामोद : तालुक्यातील राजुरा शिवारात एका तरुणीचा शिरविरहित मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला तब्बल ४५ दिवस उलटून गेले असतानाही मृत तरुणीची ओळख पटलेली नसल्याने पोलिस तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे घटनास्थळी फक्त धड सापडले असून तरुणीचे शिर अद्यापही बेपत्ता आहे.
एआयच्या मदतीने तयार केला चेहरा
या गूढ हत्याकांडाचा तपास वेगाने करण्यासाठी पोलिसांनी आता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. घटनास्थळी सापडलेल्या मृतदेहाच्या आधारे एआयच्या सहाय्याने तरुणीच्या चेहऱ्याची प्रतिमा तयार करण्यात आली आहे. या प्रतिमेच्या माध्यमातून मृत तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत अमरावती दौऱ्यात तपासाचा आढावा घेतल्याची माहिती समोर आली आहे.

आशा वर्कर, पोलीस पाटलांनाही शोधमोहीम
मृत तरुणीची ओळख पटवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन, पोलीस पाटील तसेच आशा वर्कर यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी माहिती देणाऱ्यास ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र एवढ्या मोठ्या शोधमोहीमेनंतरही तपास ठप्प असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे
.
तपासावर संशयाची सावली
२६ एप्रिल रोजी उघडकीस आलेल्या या हत्याकांडाने थेट राज्याच्या गृहविभागाचे लक्ष वेधले आहे. सुरुवातीपासूनच तपासातील गोंधळ, चुकीच्या दिशेने गेलेली माहिती आणि कथित मृत व्यक्तीच जिवंत असल्याचे समोर आल्याने बुलढाणा पोलिसांची विश्वासार्हता धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. तब्बल नऊ अधिकारी आणि २६ अंमलदारांची टीम तपासात असतानाही मृत तरुणीची ओळख पटलेली नाही, ही बाब अधिक धक्कादायक मानली जात आहे.

तरुणीचे वर्णन पोलिसांकडून जाहीर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणी अंदाजे २० ते ३० वर्ष वयोगटातील असून तिचा रंग गव्हाळ-सावळा आहे. तिच्या डाव्या हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या तर उजव्या हातात काळा दोरा होता. तसेच तिने गुलाबी रंगाची बो असलेली फ्लॅट सँडल घातलेली होती. या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी नागरिकांना पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहन केले आहे.



