
पुरुषोत्तमपुरी बोट दुर्घटनेत बीबी येथील दोन महिलांचा मृत्यू; निष्काळजीपणावर संतप्त प्रश्नचिन्ह
MH 28 News Live / लोणार : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे बुधवारी घडलेल्या भीषण बोट दुर्घटनेत बुलढाणा जिल्ह्यातील दोन महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर वाशीम जिल्ह्यातील एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. अधिक मासानिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने लोणार तालुक्यासह बीबी गावावर शोककळा पसरली आहे.

अधिक मासाच्या यात्रेत घडली दुर्घटना
हिंदू धर्मात अधिक मासाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या पवित्र महिन्यात हजारो भाविक विविध तीर्थक्षेत्रांवर स्नान व दर्शनासाठी जातात. मराठवाड्यातील पुरुषोत्तमपुरी येथेही अधिक मासानिमित्त मोठी यात्रा भरली होती. याच पार्श्वभूमीवर गोदावरी नदीतून भाविकांना नेणारी बोट अचानक बुडाल्याने मोठी दुर्घटना घडली. बोटीची क्षमता केवळ दहा प्रवाशांची असताना सुमारे पन्नासहून अधिक भाविकांना त्यात बसविण्यात आल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. अनेक महिला उतरू इच्छित होत्या, मात्र त्यांना उतरू न देता बोट पुढे नेण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.

बचावकार्यामुळे मोठा अनर्थ टळला
बोट बुडत असल्याचे लक्षात येताच उपस्थित भाविक, स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तत्काळ गोदावरी नदीत उड्या घेत बचावकार्य सुरू केले. शर्थीच्या प्रयत्नांमुळे अनेकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला. मात्र या दुर्घटनेत लोणार तालुक्यातील बीबी गावच्या प्रमिला शेषराव राठोड (५५) आणि कांता ज्ञानोबा आंधळे (६०) यांचा मृत्यू झाला. तसेच वाशीम जिल्ह्यातील महागाव येथील सिंधू अर्जुन मावळे (७५) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रशासन आणि ट्रस्टच्या भूमिकेवर संताप
या घटनेनंतर भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविल्यामुळेच हा अपघात घडला. यापूर्वीही अशा स्वरूपाच्या दुर्घटना घडूनही मंदिर ट्रस्ट आणि प्रशासनाने कोणताही धडा घेतला नसल्याचा आरोप होत आहे. लाखो भाविक यात्रेसाठी येणार असल्याची कल्पना असतानाही पुरेशी सुरक्षा व्यवस्था, प्रशिक्षित बचाव पथके आणि बोट वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण का ठेवले गेले नाही, असा संतप्त सवाल भाविकांकडून उपस्थित केला जात आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.



