
रक्षाबंधनानिमित्त मलकापूर रेल्वे डाक सेवा विभागाची नवी सुविधा आजपासून ‘मलकापूर सॉर्टिंग काउंटर’वर रात्री ९ वाजेपर्यंत पार्सल व स्पीड पोस्ट बुकिंग
MH 28 News Live / बुलढाणा : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठा दिलासा देत मलकापूर रेल्वे डाक सेवा विभागाने १ ऑगस्ट २०२६ पासून “मलकापूर सॉर्टिंग काउंटर” येथे सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत विशेष बुकिंग सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती रेल्वे डाक सेवा, नागपूरचे अधीक्षक गणेश बी. अंभोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
या विशेष सुविधेमुळे नियमित कार्यालयीन वेळेत पोस्ट ऑफिसमध्ये येऊ न शकणारे नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी तसेच इतर नागरिकांना संध्याकाळच्या वेळेतही स्पीड पोस्ट, पार्सल आणि आंतरराष्ट्रीय टपालाची बुकिंग करता येणार आहे. मलकापूर सॉर्टिंग काउंटरवर स्पीड पोस्ट बुकिंग, पार्सल बुकिंग, आंतरराष्ट्रीय टपाल बुकिंग (पत्र, पार्सल व EMS) सेवा उपलब्ध राहणार आहेत
रक्षाबंधन सणाच्या काळात बहिणींना राखी आणि भेटवस्तू वेळेत पाठविण्यासाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार असून, देशभरासह परदेशातील प्राप्तकर्त्यांपर्यंत टपाल वेळेत पोहोचविण्यास मदत होणार आहे. अधीक्षक गणेश बी. अंभोरे यांनी नागरिकांना या विशेष सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, मलकापूर रेल्वे डाक सेवा विभागाने सर्व ग्राहकांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत.



