♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

२१ वर्षांपासून रस्ता नाही, तर आमच्या सहनशीलतेचीच परीक्षा सुरू आहे ! नायगाव देशमुख ग्रामस्थांचा भावनिक आक्रोश; ‘आता न्याय द्या, नाहीतर जनआंदोलन अटळ

MH 28 News Live / मेहकर : देश चंद्रावर पोहोचल्याच्या आणि विकासाच्या गप्पा रंगत असताना, मेहकर तालुक्यातील नायगाव देशमुख गावातील नागरिक मात्र आजही एका सुरक्षित रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) अंतर्गत सन २००४–०५ मध्ये बांधण्यात आलेला MDR-45 ते नायगाव देशमुख हा रस्ता आज पूर्णपणे जीर्ण झाला असून, गावकऱ्यांसाठी तो विकासाचा मार्ग नसून रोजच्या संघर्षाचा मार्ग बनला आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समस्त ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी व संबंधित विभागांना सविस्तर निवेदन देण्यात आले.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्यावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिका प्रवास करतात. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे पाण्याखाली जात असल्याने प्रत्येक प्रवास हा धोकादायक ठरतो. गावातील पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवताना काळजीत असतात, तर रुग्णांना वेळेत उपचार मिळतील की नाही याची शाश्वती नसते.

निवेदनात रस्त्याची तात्काळ तांत्रिक पाहणी, नूतनीकरण, डांबरीकरण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, निवेदन प्राप्त झाल्यानंतर ७ दिवसांच्या आत ठोस कारवाई न झाल्यास भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

> “नायगाव देशमुखच्या जनतेने आजपर्यंत संयम पाळला, प्रशासनावर विश्वास ठेवला आणि विकासाची वाट पाहिली. पण आता हा संयम संपत चालला आहे. आम्ही कोणाकडे उपकार मागत नाही; आमच्या गावाचा आणि आमच्या मुलांच्या भविष्यासाठी सुरक्षित रस्ता हा आमचा अधिकार आहे. एखादा निष्पाप जीव गेल्यानंतर मदतीची घोषणा करण्यापेक्षा, आज रस्ता दुरुस्त करणे हेच खरे लोकसेवेचे काम आहे. प्रशासनाने या वेदनेची दखल घेऊन तात्काळ काम सुरू करावे. अन्यथा नायगाव देशमुखचा प्रत्येक नागरिक आपल्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरेल. आमचा संघर्ष कोणाविरुद्ध नाही, तर आमच्या गावाच्या भविष्यासाठी आहे.”

 

— गोपाल महादेव सुरडकर
नायगाव देशमुख (ता. मेहकर, जि. बुलढाणा)

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129