♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; जालना जिल्ह्यातील डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू, दोन मुले गंभीर जखमी

MH 28 News Live / / सिंदखेडराजा : समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा तालुक्यातील किंगाव राजा परिसरात मंगळवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात जालना जिल्ह्यातील डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू झाला. नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना त्यांच्या कारने लोखंडी सळया वाहून नेणाऱ्या कंटेनरच्या मागील भागाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात डॉ. सय्यद आसिफ (वय ५२) आणि त्यांच्या पत्नी डॉ. गुलिस्ता सय्यद आसिफ (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या दोन्ही मुलांसह चालक गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आसिफ कुटुंब नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे कारने प्रवास करत होते. समृद्धी महामार्गावरील किंगाव राजा परिसरात त्यांच्या वाहनाने पुढे जाणाऱ्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघातानंतर घटनास्थळी मदतकार्य राबविण्यात आले आणि जखमींना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.

डॉ. सय्यद आसिफ यांनी यापूर्वी बदनापूर येथील एआयएमएस वैद्यकीय महाविद्यालयात औषधशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून सेवा बजावली होती. अलीकडेच ते अन्य एका संस्थेत रुजू झाले होते. तर डॉ. गुलिस्ता आसिफ या एआयएमएस वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या या दाम्पत्याच्या अकाली निधनामुळे जालना जिल्ह्यासह वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129