
खामगाव-जालना रेल्वेमार्गाला गती; असा असेल १६२ किलोमीटरचा रेल्वे प्रवास
MH 28 News Live / चिखली : गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या बहुप्रतिक्षित खामगाव-जालना रेल्वेमार्ग प्रकल्पाला अखेर केंद्र सरकारकडून हिरवी झेंडी मिळाल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. २६ मे रोजी या रेल्वेमार्गासाठी आवश्यक भूमी अधिग्रहणासंदर्भातील राजपत्र प्रकाशित झाल्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला अधिकृत सुरुवात झाल्याचे संकेत मिळाले आहेत. लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून या प्रकल्पाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून त्यानंतर बुलढाणा व जालना जिल्हा प्रशासनाला जमीन अधिग्रहण प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले जाणार आहेत.

१६२ किलोमीटर लांबीचा हा रेल्वेमार्ग मराठवाडा आणि विदर्भाला थेट जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या मार्गामुळे बुलढाणा आणि जालना जिल्ह्यातील अनेक गावांचा रेल्वे संपर्क वाढणार असून कृषी, व्यापार, उद्योग आणि दळणवळणाच्या क्षेत्रात मोठी प्रगती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः शेतमाल वाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार असून परिसरातील शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जालना ते खामगाव दरम्यान ही आहेत स्टेशन्स
या रेल्वेमार्गाची सुरुवात जालना येथून होणार असून पुढे कचरेवाडी हे पहिले स्थानक असेल. त्यानंतर राममूर्ती, नाव्हा, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, जळगाव रोड, देऊळगाव मही, अंढेरा, मेरा खुर्द, चिखली, दहिगाव, अमडापूर, जकीया तेली आणि न्यू खामगाव अशी नवीन रेल्वे स्थानके उभारण्यात येणार आहेत. शेवटी हा मार्ग जलंब जंक्शनला जोडला जाणार असून त्यामुळे विद्यमान रेल्वे नेटवर्कशी थेट संपर्क प्रस्थापित होणार आहे.
या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवासाची अधिक वेगवान आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना, नोकरदारांना आणि व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. अनेक वर्षांपासून रेल्वे सुविधेपासून वंचित असलेल्या भागात विकासाचे नवे दालन उघडणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. खामगाव – जालना रेल्वेमार्ग हा केवळ प्रवासाचा मार्ग नसून विदर्भ आणि मराठवाड्याच्या आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला गती मिळण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



